नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मुदखेड तालुक्यातील प्राथमिक शाळा शेंबोली येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्याची सवय लागावी, या उद्देशाने बारड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व सायबर जागरुकता याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी मोबाईलचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील धोके, अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन व संदेश, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, पासवर्डची सुरक्षितता तसेच वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. इंटरनेटचा वापर करताना सतर्क राहणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास पालक किंवा शिक्षकांना माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर केवळ अभ्यासासाठी करावा असे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर, शिक्षक रामकृष्ण लोखंडे, संगीता वादळे, सुनीता केंद्रे, छाया मठदेवरु, जयश्री गायकवाड, ग्रामसेवक सेवक प्रकाश कौठेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सरदारोद्दीन शेख, शापोआ मदतनीस गोविंद गोरेवाड व विद्यार्थी उपस्थित होते.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .