[ अ.भा. शिक्षक साहित कला क्रीडा मंडळाचे पहिले विभागीय शिक्षक साहित्यसंमेलन दि.१६ रोजी माहूर येथे संपन्न होत आहे . या संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा गोषवारा.. ]
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माहुरनगरीत होत असलेल्या या शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटक व नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकर-घुगे मॕडम, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय प्रशांतजी दिग्रसकर साहेब व डॉ. सविता बिरगेजी , तहसीलदार किशोरजी यादव, गटविकास अधिकारी सुरेशजी कांबळे, उपशिक्षणाधिकारी दिलीपजी बनसोडे, अ. भा. शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराजजी मोरे, विभागीय अध्यक्ष, गट शिक्षणाधिकारी रविंद्रजी जाधव आणि रमेशजी मुनेश्वर व उपास्थित सुहृदजन...
शिक्षकांचे साहित्यसंमेलन असा वेगळा पायंडा घालणाऱ्या आपणा सर्व मंडळींचे मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या मराठी साहित्य विश्वात वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने होत असतात. मुख्य प्रवाहाच्या साहित्य संमेलनात सर्वच बाबी समाविष्ट होतात असे नाही. त्यामुळे अशा संमेलनांची गरज अधोरेखित होते. शिवाय अशा संमेलनामुळे त्या त्या भागात होणारी साहित्याबद्दलची जाणिव महत्वाची ठरते! आज माहूर नगरीत जर हे संमेलन झाले नसते तर इथे होणारी साहित्य व शिक्षण विषयक चर्चेपासून आपण दूरच राहिलो असतो. अशा संमेलनातून विशिष्ट विषयाला धरून होणारी चर्चा व होणारे विचारमंथन दिशादर्शक असते. शिक्षण व साहित्य या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने मांडला जाणारा विचार आज महत्त्वाचा आहे.
अलीकडच्या काळात विशेषत: या दशकात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आपल्यालाही अचंबित करणारे आहेत. ' जमाना बदलला' असं एका वाक्यात याचं उत्तर देऊन आपण मोकळे होतो. पण जमाना बदलला म्हणजे काय झालं? याचा विचार आपण गांभीर्याने करत नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडात खूप मोठे शैक्षणिक बदल झाले. अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके बदलली. शिक्षणाचा आकृतीबंध बदलला. यंत्रणा राबविणारी माणसं बदलली, गुरुजी बदलले आणि विद्यार्थीही. कुडांच्या शाळा ते समृद्ध भौतिक सुविधा असणाऱ्या शाळा असा बदल झाला. पण आपल्या मुख्य उद्दिष्टात बदल झाला नाही. विद्यार्थी विकास हे उद्दिष्ट घेऊन तुम्ही आम्ही कार्यरत आहोत. शिक्षक के .जी .चा असेल की पी.जी.चा! विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास हेच त्याचे उद्दिष्ट असते आणि असायला हवे.हे एकदा निश्चित झाले की मग पुढचा मार्ग सुकर होतो. ही निश्चिती करण्यासाठी आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण शिक्षकी पेशात पाऊल टाकतानाच आम्ही या उद्दिष्टाला बांधले गेलो आहोत.
शिक्षक हाच साहित्याचा मोठा वाहक आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. शाळा हे समाजाचे संक्षिप्त रूप असते तर समाज हा शाळेचे विस्तारीत रूप असतो. या संक्षिप्त आणि विस्तारीत अशा दोन्ही घटकात शिक्षक आणि साहित्यिक हे दोघेही महत्वाचे असतात. अनेकदा एवढे पूरक असतात की आपल्याला त्यांना वेगळे काढता येत नाही. शालेय स्नेहसंमेलनात कोणत्याही बडबड गीतावर किंवा बालगीतावर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या गाण्याचा कवी किंवा गीतकार कोण आहे? असं विचारलं तर तो निरागसपणे आपल्या बाईंचं किंवा गुरुजींचं नाव घेतो. त्याच्या दृष्टीने त्याचा कवी/ लेखक 'हा वर्गातच असतो. शिक्षण व साहित्य या क्षेत्रात समर्पणाच्या भावनेने काम करणारे मराठीतील एक नामवंत कवी प्रभाकर साळेगावकरांचे एक विधान खूप भावणारे आहे. ते म्हणतात," शिक्षक हा विद्यार्थ्यांचा साहित्यिक असतो आणि साहित्यिक हा समाजाचा शिक्षक असतो." मला वाटतं आपल्या संमेलनाच्या आयोजनामागचं सार आपल्याला या शब्दांत सापडतं. त्यामुळे कोणत्या शिक्षकाने मी साहित्यिक नाही असं वाटून घेण्याची गरज नाही.तुम्ही त्या चिमुकल्यांच्या विश्वातले साहित्यिक असता. त्याने टाकलेला हा विश्वास म्हणा किंवा श्रध्दा म्हणा, ती सिद्ध करण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून तुमची आमची असते. प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असणे गरजेचे नाही पण त्यानं किमान साहित्य रसिक असावयास काय हरकत आहे? बाल साहित्य व शिक्षण या क्षेत्रात काम करणारे कृतीशिल शिक्षक डॉ. सुरेश सावंत आपल्या चिंतनात म्हणतात, "भाषेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भाषाभ्यासाचा प्रवास आवडीपासून अभिरुचीपर्यंत विकसित करावा आणि हा प्रवास करताना
त्याने नकळत विद्यार्थ्याच्या मनावर साहित्यमुल्ये बिंबवावीत अशी अपेक्षा असते. बहुश्रुत आणि साहित्यप्रेमी शिक्षक वर्गाचे रूपांतर स्वर्ग करु शकतो." या चिंतनाचा विचार आपण केल्यास आपणास निश्चित काय करावयाचे आहे याचा अदमास येऊ शकतो.
साहित्यप्रेमी असण्याचा पहिला निकष म्हणजे आमच्या वाचनाची' यत्ता' कोणती आहे याचा विचार होणे महत्वाचे आहे, यातूनच मग आपल्या ईयत्तेच्या वर्गाचे वाचन आपण सांगू शकतो. कोरीनाकाळाने शिक्षणासाठी म्हणून विद्यार्थ्याच्या हाती मोबाईल दिला आणि उरलेसुरले वाचनही संपून गेल्याची आजची स्थिती आहे. दोन वर्षाच्या शैक्षणिक खंडानंतर आपण अध्ययन स्तर वाढविण्याच्या प्रयत्नात राहिलो. त्यामध्ये आता बऱ्यापैकी यश आले असताना अध्ययन क्षमतांचा विचार आपण करतो आहोत . आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन कसे वाढवता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अथवा मध्यमवर्गीय पालकांना सुध्दा आपल्या घरातील कपाटात चार वाचनाची पुस्तकं असावीत असं वाटत नाही. मग तुम्ही आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्या पालकांकडून आपण काय अपेक्षा करणार आहोत? या पार्श्वभूमीवर शाळा याच साहित्याच्या वहनाचा केंद्रबिंदू झाल्या पाहिजेत. शिक्षकाने यात भूमिका घेण्याची गरज आहे. शासन आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनीय पुस्तके विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश सार्वजनिक वाचनालयांना देण्यात आले आहेत याचा उपयोग आपण किती सकारात्मकपणे करतो हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने नायक असणाऱ्या शिक्षकाने या आपल्या वर्तनातून वाचनाचे संस्कार करण्याची गरज आहे.
या वाचनाच्या ईयत्तेची पुढची पायरी म्हणजे लेखन आहे. ते साऱ्यांनाच जमते असे नाही, पण ज्यांना जमते त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. तुमच्या आमच्या लेखनाला अधिकारी सरकारी, समाज प्रोत्साहन देईल. पण बालकांच्या प्रतिभेचं काय? हा प्रश्न उरतोच. सुदैवाने नामदेव माळी, तृप्ती अंधारे ,व्यंकटेश चौधरी असे अधिकारी प्रा. डॉ. भगवान अंजनीकर, प्रा. डॉ. सुरेश सावंत, शिवाजी अंबुलगेकर यांच्यासारखे शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्यासमोर पथदर्शक आहेत. महाराष्ट्रात या दृष्टीने काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या बऱ्यापैकी आहे. विस्तार भयास्तव ही उदाहरणे इथे उद्धत करता येत नसली तरी त्याची नोंद आपण विस्तृतपणे घेत आहोत. शाळा, केंद्र, तालुका असा निश्चित भाग निवडून यासाठी गांभीर्यपूर्वक व रचनात्मक आणि सकारात्मक प्रयत्न झाले तर यामधून बालप्रतिभेचा नवा उन्मेश समोर येणार आहे. या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून यासाठीचे योगदान देण्याची ग्वाही मी आपणास देतो.
शिक्षक आणि साहित्यिक म्हणून समाजासमोर असणाऱ्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतच अडथळा ठरत नाही तर त्यांच्यावर शारीरिक बाबीवरही दुष्परिणाम करीत आहे. यासाठी पहिल्यांदा जेष्ठांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 'मोबाईल उपवास' संकल्पना आम्ही राबविली त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. प्रथम स्वेच्छेने आणि होत नसेल तर सक्तीने या विषयात काम करण्याची गरज निर्माण झाली आहे-.प्रायोगिक तत्वावर का होईना याची सुरुवात करणे आता आवश्यक झाले आहे, याचा गांभीर्याने आपण विचार कराल असा विश्वास आहे.भारतीय स्वातंत्र्याची पूर्ती करणा-या हैहाबाद मुक्तीसंग्रामाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आपल्या प्रदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणा -या लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी किमान या वर्षात आपण काही निश्चय पावलं उचलून त्यासाठी व्यापक प्रयत्न करु या.अनाम वीरांनी दिलेल्या बलिदानातून हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा लढा आपण नव्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे .त्या दृष्टीने आपल्यातला साहित्यिक व शिक्षक जागृत ठेऊ या..
कोणताही काळ प्रश्नांशिवाय नसतो.या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे सामर्थ्य तुम्हा आम्हांजवळ असायला हवे. यासाठी रमेश इंगळे उत्रादकर या शिक्षक असणाऱ्या साहित्यिक बांधवाने मागलेला हे पसायदान आपण निर्मिकाजवळ मागू या ..
"इतुकेची बळ अंगी यावे फक्त
खडूत रक्त उतरावे
उतरावे आणि देह व्हावा मुग्ध
खडूतून दूध स्त्रवताना"


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .