गणेश घुले यांचं ऑक्सिजन देणारं 'झाड'

शालेयवृत्त सेवा
0



 गणेश घुले यांचं ऑक्सिजन देणारं 'झाड'


        "झाडांना कधी सुकू देऊ नका. त्यांना नेहमी हिरवगार ठेवा. ज्या दिवशी झाडांचा हिरवा रंग जाईल, तेव्हा पृथ्वी रंगहीन होईल. पृथ्वीवर झाडं राहणार नाहीत, तो पृथ्वीचा शेवट असेल. तेव्हा पृथ्वीला कुणीच वाचवू शकणार नाही." असा जीवनदायी संदेश देणार पुस्तक " झाड " साहित्यिक गणेश घुले यांनी झाडं लावणाऱ्या.. झाडांना आपलं मानून झाडांसाठी लढणाऱ्या सर्व हातांना.. अर्पण केलं आहे.


       "सुंदर माझी शाळा" या बालकवितासंग्रहानंतर गणेश घुले यांची 'झाड' ही किशोर कादंबरी आपल्या भेटीला आलेली आहे. ही कादंबरी केवळ 'झाडे लावा' असा कोरडा उपदेश करत नाही, तर झाडाचे महत्त्व पटवून देऊन मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या पर्यावरणप्रेमाची ओढ निर्माण करते. झाडाचे आत्मकथन सांगणारी ही कादंबरी झाडाच्या भूमिकेतून मांडलेली आहे, जिथे झाड माणसाला स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी कळकळीचे आवाहन करते. या कादंबरीचा मुख्य गाभा म्हणजे निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील नाते. झाड हे केवळ एक वनस्पती नसून ते सजीवांचे आश्रयस्थान आणि मानवाचा निस्वार्थी मित्र कसे आहे, याचे चित्रण लेखकाने केले आहे.


        बालवाचकांच्या दृष्टीने यातील कल्पनाशक्ती अत्यंत प्रभावी आहे. मुलांच्या भावविश्वात झाडं बोलतात, खेळतात आणि संवाद साधतात. लेखकाने झाडाच्या वाढीचे आणि त्याच्या भावनेचे वर्णन इतक्या सहजतेने केले आहे की, लहान मुलांना ते स्वतःच्या आयुष्याशी जोडता येते. बाल कादंबरीमध्ये चित्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. या पुस्तकातील मांडणी आकर्षक असून ती मुलांच्या कुतूहलाला जागृत ठेवते. गणेश घुले यांची ' झाड' ही बाल किशोरासाठी प्रॉमिथिअस बुक्सने प्रकाशित केलेल्या या कादंबरीत शशी शेट्ये यांनी चित्रे साकारली आहेत, ज्यामुळे विषयाची मांडणी अधिक जिवंत वाटते.लेखकाची भाषा अत्यंत साधी आणि सोपी आहे, जी किशोरवयीन मुलांच्या मनाला थेट भिडते. बोजड शब्दांचा वापर टाळून त्यांनी विषयाची मांडणी प्रवाही ठेवली आहे.

      

         गणेश घुले यांची 'सुंदर माझी शाळा' हा बालकविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या बालकवी पुरस्कारासह एकूण 14 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. या काव्यसंग्रहाची साहित्य अकादमी  पुरस्काराच्या अंतिम यादीत सलग दोन वर्ष निवड झाली होती. त्याच नावाने बाल कुमाराचे आत्मबळ वाढवणाऱ्या बालकविता आणि गीतांच्या सांकेतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर एकूण १०१ कार्यक्रम सादर झालेले आहेत. इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या मराठी पुस्तकात 'जिभेचे चवीला कळते सारे' या कवितेचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीच्या भाषा समितीवर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये बाल साहित्यावर त्यांचे संशोधन सुरू आहे. बालकुमार फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून बालकुमारासाठी विविध साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम ते राबवित असतात. सुजाण पालकत्वाचे भूमिका मांडणाऱ्या काव्य गीतांचा 'प्रिय आई बाबा' या सांगितिक कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली आहे.


        वडाच्या झाडाचं आत्मकथन म्हणजे ही कांदंबरी !  गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा वाचली पाहिजे.. त्यासोबतच गावातील सुखदुःखाच्या आठवणीच गाठोड असलेलं वडाच झाड सुद्धा वाचलं पाहिजे.. आणि गावातील ग्रामदैवताच्या मंदिराला धक्का सुद्धा लागू नये याची गावकऱ्यांची धडपड.. तसेच शाळेच्या शिक्षकांची - मुख्याध्यापक - विद्यार्थ्यांची - शिक्षणाधिकारी यांची घालमेल.. नंदा आजीचे आणि तिचा मुलगा अतुल यांच्या भेटीने गावावरचे संकट कस टळलं.. काय तोडगा निघाला.. काय सांगावं या पुस्तकाबद्दल एकदा हातात घेतलं की पूर्ण वाचल्याशिवाय राहत नाही. मी तर म्हणेन गणेश घुले यांचं ऑक्सिजन देणार झाड सर्वांनी घ्याव.


       "झाड" ही कादंबरी मुलांना निसर्गाच्या जवळ नेणारी आणि त्यांच्या संवेदनशील मनावर सकारात्मक परिणाम करणारी एक दर्जेदार साहित्यकृती आहे. जर तुम्हाला लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असेल आणि त्यांना निसर्गाची गोडी लावायची असेल, हे 'झाड' प्रत्येकांच्या घरी आणि शाळेतही असायला हवे.


       छत्रपती संभाजीनगरचे कवी विकास नवाळे यांची कविता आठवते..

झाडे बोलू लागली तर..

त्यांनाही सांगता येतील त्यांच्या जन्माच्या कथा व आयुष्याच्या व्यथा, 

झाडानाही मिळेलच की हक्क त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, 

अन त्यांच्यावर वार करणाऱ्या प्रत्येक कुऱ्हाडीला नाही म्हणण्याचा..

झाडांवरही होतंच असतो की दरोरोज अत्याचार, 

कुणीतरी कुस्करतो एखाद्या नवजात कळीला, 

तर कुणी चुरगाळतो वयात आलेल्या वेलीला, 

हल्ली तरण्याबांड झाडांच्याही होतच असतात दरोरोज कत्तली, 

पण त्यांची वकिली करण्यासाठी एखाद्या झाडलाच बोलत व्हावं लागेल, 

अन् त्यांच्या झाड नावाच्या समाजासाठी सुद्धा 

एखादा खटला लढवावाचं लागेल..

झाडं बोलू लागली तर..

एखादं गाण म्हणतीलचं पक्ष्यांसाठी, 

चार शब्द आभाराचे सांगतीलही त्यांच्यासाठी राबणाऱ्या एखाद्या माणसासाठी,

पण झाडं कधीच करणार नाही भाव फांदीवरच्या फळांचा, 

अन कधीच सांगणार नाही हक्क झाडाखालच्या सावलीचा..

झाडं कायम बोलत राहतील समानतेची भाषा, 

झाडं दाखवत राहतील उजाड माळरानावर जगणाच्या आशा, 

झाड कधीच सांगणार नाही त्यांची धर्म जात अन पंथ 

झाडांचा विचार समजला तर त्यातच दिसेल एखादे संत..


◾ पुस्तकाचे नाव : झाड

लेखक : गणेश घुले

प्रकाशक : प्रॉमिथिअस

किंमत : २५० रु.


यादवपुत्र रमेश मुनेश्व

किनवट, संवाद : ७५८८४२४७३५

(राज्य पुरस्कृत शिक्षक तथा बालभारती सदस्य )




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)