मा. श्रीम. वर्षा ठाकूर - घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या सभे अंतर्गत घेतला शैक्षणिक कार्याचा आढावा व दिले आवश्यक निर्देश...

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आज दि. 01 मार्च 2021 रोजी सन्माननीय श्रीम. वर्षा ठाकूर - घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुणवत्ता कक्षाची सभा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे संपन्न झाली. डॉ. रवींद्र अंबेकर, प्राचार्य, डाएट,नांदेड, मा. श्री. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, मा. श्री. माधव सलगर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक,मा. दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी, निरंतर , सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व इतर यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.


 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांचे डॉ. रवींद्र अंबेकर, प्राचार्य,डाएट,नांदेड यांनी पुस्तक भेट देऊन सर्वांच्या वतीने  स्वागत केले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी डाएटचे स्वरूप, सर्वांचा परिचय करून घेताना लॉकडाऊनच्या काळात केलेली आणि करत असलेली कामे जाणून घेतली व सभेला सुरुवात झाली.


 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी सभेत केलेल्या सूचना/ दिशा निर्देश :- 


 ▪️विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी , संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले. 


▪️मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी  शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या संदर्भाने अनेक मुद्द्यांना स्पर्श केला . सध्याचे युग हे तंत्र युग आहे , त्यामुळे  शिक्षकांनी तंत्रस्नेही  असण्याबरोबर  विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही बनवणे गरजेचे आहे .असं सांगताना मुलांना साध्या  संगणकाच्या प्रणाली,  गुगल ओपन करणे,  , वर्डमध्ये काही लिहिणे,  चित्र रेखाटन करता येणे,  ई-मेल वापरणे अशा साध्या गोष्टी करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पारंगत करता येईल असे वेगळे प्रयत्न करावेत ,अशी सूचना त्यांनी केली.


▪️रूटीनमध्ये अडकून बसू नका , नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास धरा  यासाठी  सर्व प्रयत्न गटशिक्षणाधिकार्‍यांनी करणे गरजेचे आहे . इंग्रजी भाषा आणि गणितात मुले मागे पडतात यासाठी   मुलांच्या कुठल्या अडचणी आहेत त्या शाळास्तरावर शिक्षकांनी समजून घ्याव्यात. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटीदरम्यान या बाबी पाहणे गरजेचे आहे. 

 

▪️प्रत्येक शाळेत  सुंदर ग्रंथालय असायला हवे .पुस्तकांची नीट मांडणी केलेली असावी .  पुस्तकांचे वर्गीकरण केलेले असावे. अशा पुस्तकांची देवघेव विद्यार्थ्यांना होते का, विद्यार्थी वाचतात का, विद्यार्थ्याने वाचल्यावर त्यावर काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत का, अशा पद्धतीने दस्तावेज ठेवून सर्व ग्रंथालय सुसज्ज करावेत. 


▪️माझा गाव सुंदर गाव या अंतर्गत  सर्व गाव पातळीवर स्वच्छतेचे अभियान सुरू आहे.  शाळांनीही याच्यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.  सर्व शाळांची रंगरंगोटी  आणि स्वच्छता, अभिलेखे वर्गीकरण या बाबतीत  काम केलेलं असलं पाहिजे . या बाबी  स्वतः भेटी देऊन पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


▪️जे शिक्षक उत्तम काम करतात  त्यांची नोंद घ्या  .त्यांच्या यशकथा  तयार करा असे सांगून शाळांमध्ये राबवावयाची शैक्षणिक पंचसूत्री त्यांनी सांगितली.


▪️एक तास वाचनासाठी, प्रयोगशाळांचे सक्रीयीकरण , शिक्षक मित्र उपक्रमाची व्यापकता व पुनरुज्जीवन, स्पोकन इंग्लिश याबाबत अधिक काम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले.


▪️शाळाबाह्य मुलांची समस्या गंभीर आहे हे चित्र विदारक वाटते. शाळाबाह्य मुलांना शाळेत जाणं हा कोविड काळातील मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाच्याप्रती अत्यंत गांभीर्याने काम करावे असे सांगून त्यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागांनी समन्वयाने एकत्रित काम करावे म्हणजे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


▪️विद्यार्थ्यांच्या आधार कार्डबाबत  काम होणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांचे डुप्लिकेशन मोठ्या प्रमाणात आहे. हे  शोधून काढा.  ज्यांनी  या बाबत जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी लागेल  असेही संकेत त्यांनी दिले.

उत्तम शैक्षणिक काम केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी लोहा श्री. रवींद्र सोनटक्के व मुदखेड येथील बारड बिटचे  शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुधीर गुट्टे  यांचा यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. रवींद्र आंबेकर, प्राचार्य, डायट,नांदेड यांनी डाएट मार्फत घेण्यात येत असलेले उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठीचे नियोजन आदींची माहिती दिली. डायटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता जयश्री आठवले यांनी उपयुक्त शाळा भेटीचे,श्री. सुदर्शन चिटकुलवार,ज्येष्ठ अधिव्याख्याता यांनी चला शिकू या प्रयोगातून विज्ञान तर डॉ. माणिक जाधव, अधिव्याख्याता यांनी PGI, गोष्टीचा शनिवार या उपक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी कौतुक केले.


अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे, डॉ. अतुल चंद्रमोरे, श्री.उमेश नरवाडे, श्री.अभय परिहार, श्रीम. ज्योत्स्ना धुतमल, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे ,अर्चना बागवाले , सर्व विषय सहाय्यक यांची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)