संवेदनशील कवी 'हृदयाक्षर' मिलिंद कंधारे यांचा आत्मस्वर म्हणजे आत्मार्त...!!!

शालेयवृत्त सेवा
0

 




                आजकाल कवितेच्या क्षेत्रात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे परिवर्तन पहायला मिळते. कवितेचे अनेक प्रकार उदयास येतानाही पहावयास मिळते. याच काळात 'आत्मार्त'हा काव्यसंग्रह एक वेगळा रंग आणि वेगळी छटा घेऊन आलाय हे निश्चितच कौतुकास्पद आहे. 

       जि.प.प्रा.शिक्षक कवी मिलिंद कंधारे म्हणजे 'हृदयाक्षर'यांचा हा काव्यसंग्रह माझ्या हातात पडल्या नंतर सर्वप्रथम मी या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर येऊन खिळलो. कमालीचा अर्थगर्भ असणाऱ्या या मुखपृष्ठ वरून पुस्तकातील भाव प्रकटतांना दिसतं. माहूर नगरीचे भूमिपुत्र आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजित वर्मा यांनी रेखाटलेल्या या चित्राला बघतच रहावेसे वाटते.आपल्या आत्म्याचा आवाज दाखवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.रणजीत वर्मा हे एक प्राथमिक शिक्षक आहेत हे इथे आवर्जून सांगावे लागेल कारण कवी मिलिंद परशराम कंधारे अर्थात हृदयाक्षर हे सुद्धा एक प्राथमिक शिक्षक असल्याने या दोन शिक्षक मित्रांनी पुस्तकात अंतर्बाह्य अप्रतिम भट्टी जमवून आणली. 

            आत्मार्त म्हणजे आत्मस्वर,आत्म्याचा आवाज, आत्म्याचा आर्त टाहो, सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार इतकेच नाही तर समाजातील प्रत्येक स्तरातील आत्म्याची सल म्हणजेच आत्मार्त हे या काव्यसंग्रहातून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला आहे. 

              आत्मार्त मध्ये  एकूण 35 कविता असून प्रत्येक कवितेतून समाजभान, जाणीव जागृती, सर्वधर्म समभाव, आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे. पुस्तकात योग्य त्या ठिकाणी कवितेला साजेसे चित्र रणजित वर्मा यांनी सजवले आहे.एकंदरीत पुस्तकातून कवीने आपल्या सर्व क्षमतेचे दर्शन दिले आहे. 

                   पुस्तकाची प्रस्तावना करवीर चे गटशिक्षणाधिकारी व संगीत दिग्दर्शक, गायक तथा लेखक-कवी विश्वास सुतार यांची आहे. ते प्रस्तावनेतच कवी हृदयाक्षर यांच्या अनेक पैलूंना उजाळा देत आत्मार्त या काव्यसंग्रहाचे मंथन करतात. ते त्यांच्या बदल बोलताना म्हणतात की, आत्मार्त म्हणजे मिलिंद कंधारे यांचे तळमळीचे सांगणे आहे की, माणूस बना...! 

             पुढे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि कवींचे मनोगते पुस्तकात समाविष्ट आहेत.ऋणनिर्देश करताना कवी मिलिंद आपल्या मनोगतात अप्त स्वकीयांच्या सोबतच इतर मार्गदर्शक आणि वरीष्ठ मंडळींचे प्रांजळपणे ऋण व्यक्त करतात. 

                काव्यसंग्रहाची सुरवात इमान जेव्हा विकलं जातं..... या कवितेने होते. त्यात ते बेईमान प्रवृत्तींना जबरदस्त फटकारतात. कळेना काय चुकले या कवितेत ते मानवतेच्या मळ्याचा संबोध स्पष्ट करतात. खरच तिचा स्वभाव कळलाच नाही या कवितेतून स्त्रीचे विवीध रुपे ते सांगतात.असंमज प्रेम या कवितेतून तरुणांना आपलेसे करत ते भानावर ही आणतात. 

               मांड मराठी जाई पुढे ही कविता मराठ्यांचे गर्वगीत म्हणून पुढे गाईली जाईल यात शंका नाही. नमाज ही कविता मुस्लिमच नाही तर बाकी सर्वच धर्मांना खरी नमाज काय? हे सांगण्यासाठी यशस्वी ठरते. गोष्ट तेव्हाची ही कविता वाचकांना बालपणात घेऊन जाते. बुडधरुन, डिंगारलेले नेते, निवडायचे कुणाला, बळीचे राज्य येईल का? या कविता आजच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती वर परखड भाष्य करतात. 

             उभारा मंदिरं या कवितेतून कवी मनातील यातना,आजची गरज आणि हवरट मनोवृत्ती रेखाटतो.

इतकेच नाही तर मिश्किल हास्य घेऊन हसत हसत जीवनाचे रहस्य सांगण्यात हास्य बहुरंगी, सफर एका प्रेमाचा, लाॅकडाऊन मधली बायको, फाटका हिरो सारख्या कवितांचा नजराणा कवी  हृदयाक्षर यांच्या लेखनीने वाचकांना बहाल केला आहे. 

              माझी माय ही कविता डोळ्यात पाणी आणते. हसत हसत रडायलाही लावून कवी आपल्या बहुरंगी लेखनाची छाप दाखवून जातो. यंदाच्या पाडव्याला या कवितेत स्वच्छतेच्या गुढ्या उभारण्याचे आवाहन कवी करत तर आहेच पण जळू दे या कवितेतून अहंम, अहंकार या होळीत जळू दे म्हणत कवी मिलिंद निसर्गाला जाणीवेचेही दान मागतात. 

                 काव्यसंग्रहाचे मलपृष्ठ कवी-लेखक-गीतकार-संगितकार भोला सलाम यांना आरक्षित आहे. ते कवी मिलिंद यांच्या समवेत भोला-मिलींद या नावाने गीतकार आणि संगीतकार म्हणून जोडीने काम करत आले आहेत. ते कवी हृदयाक्षर मिलिंद यांची पाठराखण करतांना कवीचे समाजाप्रती आसणारे लेखन उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे ते म्हणतात. 

              पुस्तकाचे प्रकाशन शब्दवेध प्रकाशन औरंगाबाद येथील असून उत्तम प्रतिचे, दर्जेदार ग्रंथनिर्मिती मध्ये आत्मार्त चा ही समावेश प्रकाशक वैजनाथ वाघमारे यांनी आत्मार्त च्या माध्यमातून केला आहे. त्यांना मुद्रक रुद्रायणी,औरंगाबाद यांनी साथ दिली आहे. 

          परिवर्तन हा निसर्ग नियम आहे व जे जे हितकारक आहे ते स्विकारणे हा मानवाचा स्वभाव.जे जे चांगले त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. 

             पारंपरिक चौकट दुर सारुन कवी हृदयाक्षर म्हणजे मिलिंद कंधारे यांच्या लेखणीतून स्फुरलेला "आत्मार्त" हा काव्यसंग्रह मी वाचला. तो खोलवर स्पर्शून गेला.हा काव्यसंग्रह जो वाचेल त्याच्या काळजाला भिडल्या शिवाय राहणार नाही हेच सत्य आहे. 

                 आत्मार्त हा काव्यसंग्रह अतिशय मार्मिक, संवेदनशील तर आहेच पण तो जीवनमूल्ये आंतरात्म्यात रुजवतो.स्व ची जाणीव करून देत भले-बुरे व स्वार्थ-परमार्थाची उकल आत्मार्त करवीतो. कवी वास्तव आणि अवास्तव भेदांची उकल, सत्य-असत्याचे प्रमाण आणि देशभक्ती ची अमिट छाप आपल्या लेखनातून करून देत ऐक्याचा संदेशही देतो. एक संपूर्ण लेखनाचे व मर्मस्पर्शी वर्णनाचे महत्तम उदाहरण म्हणजे कवी हृदयाक्षर मिलिंद यांचा "आत्मार्त" हा काव्यसंग्रह.जो वाचकांच्या मनस्वी पसंतीला उतरेलच. तो आपण वाचावा. 

               कवी हृदयाक्षर म्हणजेच मिलिंद कंधारे हे एक उत्कृष्ट अध्यापक तर आहेतच पण तितकेच ताकदिचे कलावंत, गीतकार, संगीतकार व लेखक आहेत... आत्मार्त च्या माध्यमातून ते एक हळव्या मनाचा कवी साकारुन समाजाप्रतीचं कर्तव्य पार पाडताहेत. आत्मार्त या काव्यसंग्रहास माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. 



समिक्षक-श्री. शेषराव संभाजीराव पाटील 

(अध्यापक-जि.प.प्रा.शाळा- लिंबायत(जुने),

ता-माहूर,जि-नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)