वाढदिवसाच्या निमित्ताने केले वृक्षारोपण !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या वाढदिवशी आपल्या शाळेत, परिसरात, घरात, शेताच्या बांधावर झाडे लावावीत. झाडे सर्वांना फळे देतात, सावली देतात. मग तो साधू असेल, संत असेल, चोर असेल किंवा झाडाला पाणी टाकणारा असेल किंवा नसेल तरी सुद्धा ते सावली देतात. कोणालाही नाकारत नाहीत. झाड हे जणू ईश्वराचे दुसरे रूप आहे, असे मत शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथे शालेय विद्यार्थी व पालकांच्या वतीने आयोजित वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते.
यावेळी वांगी येथील विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना, प्रत्येक विद्यार्थी हा बोलका झाला पाहिजे व ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना संवाद साधता येत आहे. संवाद साधताना त्यांना खूप आनंद होत आहे. या शाळेतील सर्व शिक्षक अतिशय उपक्रमशील आहेत. शिक्षक हे देशाला नव्हे तर समाजाला दिशा देणारे होकायंत्र आहेत. प्रत्येकाने आपल्याला दिलेले कार्य प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वरसेवा ठरेल, म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असावे, असेही ते यावेळी म्हणाले.
वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यावतीने त्यांचा ग्रंथ भेट देऊन व त्यांच्या हस्ते 'वडाचे' झाड लावून शाळेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेतील काही उपस्थित विद्यार्थी बापुजी जाधव, सोनी धुमाळ, समीक्षा सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यंकटेश चौधरी यांनी शाळेला बालवाचकांसाठी ग्रंथ भेट देऊन शाळेत शालेय विद्यार्थ्यांना आपण नियमित अभ्यास व वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या वेळी केंद्रप्रमुख बाबुराव जाधव, मुख्याध्यापिका लक्ष्मी गायकवाड, उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड, अजित कदम, संभाजी घोनशेटवाड, रूपेश गाडेवाड, सारंग स्वामी, गणपत मुंडकर आदी शिक्षक उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. सायली शहापुरे हिने केले तर आभार कु. कांचन मिरकुटे हिने मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .