'घरातूनच शाळा व सुपरसंडे' उपक्रमाला चारशे दिवस पूर्ण

शालेयवृत्त सेवा
0



धर्माबाद तालुक्यातील रामपूर ध. येथील जिल्हा प्राथमिक शाळेचा उपक्रम !


नांदेड (नासा येवतीकर) :

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना घरी बसल्या बसल्या अभ्यास करता यावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या घरातूनच शाळा व सुपर संडे या उपक्रमाला 27 ऑगस्ट रोजी 400 दिवस पूर्ण होत आहेत. धर्माबाद तालुक्यातील रामपूर ध. येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक नंदकुमार राजमल्ले व मुख्याध्यापक नागेश वरगंटवार यांनी लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरच्या घरी अभ्यास करता यावे म्हणून व्हाट्सएपच्या माध्यमातून घरातूनच शाळा व सुपरसंडे या उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यातील चार तारखेला माझा अभ्यास म्हणून पहिली पोस्ट टाकून केली.


 या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मोबाईलचा वापर अत्यल्प असून, मुलांना सहज समजेल अशी पोस्ट रोज सकाळी सहा वाजता त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर टाकल्या जाते. मुले तो अभ्यास पाहून वहीत नोंद करतात आणि दिवसभर त्यावर काम करत राहतात. विद्यार्थी पूर्ण केलेला अभ्यास ग्रुपवर पाठवितात. लगेच शिक्षक ते तपासून प्रलोभनपर सूचना देत प्रोत्साहित करतात. इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठीच्या या उपक्रमात शाळेतील 37 विद्यार्थी तर इतर शाळेतील 91 विद्यार्थी असे एकूण 128 विद्यार्थी या सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी महत्वाची भूमिका कोण बजावतो ? तर ते आहेत पालक आणि शिक्षक. म्हणून या उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातून 963 शिक्षक आणि 206 पालकांनी आपला सहभाग नोंदविला असून त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे अभ्यास दररोज पाठवितात. 


आजपर्यंतच्या चारशे दिवसाच्या या कार्यक्रमात मराठी, गणित, इंग्रजी, कला, कार्यानुभव, सुपरसंडे आणि दिवाळी शुभेच्छा असे एकूण 400 दिवसाचे कार्य दिलेले आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यांची नोंद त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही कामात सातत्यपणा ठेवले तर त्या कार्यावरचा विश्वास अजून जास्त वाढतो. सलग चारशे दिवस मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी नंदकुमार राजमल्ले यांनी केलेले प्रयत्न खूपच प्रशंसनीय आणि अभिनंदनीय आहे. 


नांदेड जिल्हा परिषदे शिक्षण विभाग प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मा. प्रशांत जी दिग्रसकर साहेब, नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. रवींद्र जी अंबेकर साहेब, उपशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती साहेब, धर्माबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. लोकदाजी गोडबोले साहेब, बाळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. एस.डी.आंदेलवाड साहेब, केंद्रीय मुख्याध्यापक मा.संतोष नाईक साहेब, शिक्षकमित्रांच्या मार्गदर्शनामुळे व शालेय शिक्षण समिती, पालकवर्ग, गावकरी यांच्या प्रतिसादामुळे उपक्रमाचे चारशे दिवस पूर्ण करू शकलो आणि यापुढे उपक्रम चालूच ठेवणार अशी प्रतिक्रिया संयोजक नंदकुमार राजमल्ले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. 


नंदकुमार राजमल्ले सर यांनी कोविड-१९ च्या काळात घरातूनच शाळा आणि सुपरसंडे हा उपक्रम राबविला आज त्या उपक्रमाला ४०० दिवस पूर्ण होत आहेत. निश्चितच ही बाब शिक्षण विभागासाठी अभिमानाची आहे. याकाळात विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत त्याची व्याप्ती वाढवली आहे. त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा.

-मा.प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा.)

जिल्हा परिषद,नांदेड


व्हाट्सएपच्या माध्यमातून चालविलेल्या या उपक्रमातील प्रश्नांची मांडणी हे विद्यार्थी  स्वयंअध्ययन व अध्ययन निष्पतीवर आधारित असून विद्यार्थी सृजनशीलतेला चालना देणारे आहेत. सुपरसंडेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना वाव देता आले. विद्यार्थी-पालकांचे प्रतिसाद, वर्गानुसार नियोजन व सातत्यातून कोरोना काळातही विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवून उपक्रम यशस्वी केल्याबद्दल नंदकुमार राजमल्ले व सहकारी शिक्षकाचे अभिनंदन.

- मा. रविंद्र अंबेकर, प्राचार्य

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन आहे. 22 मार्च 2020 पासून शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. मुले अभ्यासापासून दूर जाऊ नये म्हणून या काळात विद्यार्थ्यांना घरातल्या घरात काही अभ्यास करता यावा यासाठी घरातूनच शाळा व सुपरसंडे हा उपक्रम व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून चालविला जात आहे, या उपक्रमाला आज 400 दिवस पूर्ण होत आहेत, जे की प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रयोगशील शिक्षकांचे अभिनंदन. 

- एल. एन. गोडबोले

गटशिक्षणाधिकारी, पं. स. धर्माबाद

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)