नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड येथे शिक्षण, आरोग्य, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नांदेड, सलाम मुबंई फाउंडेशन व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शक, विषय शिक्षक यांच्या ऑनलाईन कार्यशाळेत बोलताना तरूणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची गरज असल्याचे मत शिक्षणाधकारी प्रशांत दिग्रसकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आताची पिढी अनुकरणीय असून ते आपल्या आजूबाजूला असणार्या चांगल्या, वाईट गोष्टी शिकत असते. जर त्या मुलांना बालवयातच शाळेत तंबाखू मुक्तीचे फलक, दुष्परिणामांची माहिती दिली, तर तो तरुणपनी जीवनात व्यसनाच्या आहारी जाणार नाही. तो उद्याच्या भारताचा सशक्त नागरिक म्हणून काम करेल. तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेला शाळा पाहणी करण्यासाठी गेल्यावर आवर्जून तंबाखूमुक्त शाळेचे निकष तपासण्याच्या सूचना केल्या. सर्वांना आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले.
यावेळी सलाम मुबंई फाउंडेशनचे सचिन वानखेडे यांनी तंबाखूमुक्त शाळा निकष व जिल्ह्यातील शाळांचा सहभाग, कोरोना व तंबाखूमुक्त शाळा याबाबत मार्गदर्शन केले, तर तंबाखू नियंत्रण कक्ष नांदेडचे डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी ऍलोलाईन अभियानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील कार्यशाळेस सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शक, विषय शिक्षक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नागेश क्यातमवार, रवी ढगे, रमेश मुनेश्वर, सचिन वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .