जयभीम : चित्रपटाच्या निमित्ताने.. स्वप्नील भालेराव

शालेयवृत्त सेवा
0

 



चित्रपटाच्या सुरुवातीच्याच प्रसंगात आपणास दिसते की तामिळनाडूतील कुठल्यातरी एका जेलमधून शिक्षा भोगून मुक्त झालेले काही कैदी भल्या मोठ्या दारातून बाहेर पडत आहेत आणि जेलच्या दारात उभा असलेला एक पोलिस अधिकारी प्रत्येक कैद्याला त्याची जात विचारतो आहे. जे कैदी ' ईरुआला ' आदिवासी जातीचे असतात त्यांना मोकळे न सोडता जबरदस्तीने तो अधिकारी त्यांना एका बाजूला दोन गटात जबरदस्तीने उभे करतो आहे. त्या ठिकाणी आलेले इतर दोन पोलीस ठाण्याचे अधिकारी नोटांचे बंडल जेल अधिकाऱ्याच्या हातात सरकवतात आणि आपापल्या पोलिस गाड्यांमध्ये त्या बाजुला उभे केलेल्या ईरुआला आदिवासींना कोंबड्यांसारखे कोंबून त्या पोलिसांच्या गाड्या पसार होतात. आता ते पोलिस त्यांच्या त्यांच्या ठाण्यातील अन्य कुठल्यातरी केसेसमध्ये त्यांना हवे असलेले, परंतु प्रत्यक्षात न सापडलेले गुन्हेगार जणुकाही पोलिसांनी आत्ताच पकडले म्हणुन या असहाय्य सर्वहारा, कोणतीही आयडेंटी नसणाऱ्या आदिवासींना परत गुन्ह्यात अडकवून स्वतःची अडकलेली प्रमोशन्स मिळवणार असतात.


      हा प्रसंग पाहिल्यावर पोलिसांच्या नीचपणाचा आणि चित्रपटाच्या कथेचा आपणास थोडासा अंदाज येतो. 

     

       चित्रपटाची कथा सत्यकथेवर आधारित आहे. ही सत्यकथा राजाकुन्नी आणि सेन्गेनी या ईरुआला आदिवासी जोडप्याची आणि त्यांच्या जमातीची आहे. ईरुआला ही रानावनात मुक्त पाखरांप्रमाणे रहाणारी जमात आहे. रानात प्राणी आणि पक्षाची शिकार करुन उदरनिर्वाह करणारे, तर कधी शेतातील उंदरांच्या बिळात उंदरांनी साठवलेले धान्य गोळा करणारे, किंवा बिळातले उंदीरच मारुन त्यावर गुजराण करणारी जमात आहे. यांना भारतीय नागरिक म्हणुन सरकार दरबारी कोणतीही ओळख नाही. निवांत झोपता येईल असा शुल्लक ६×२ फुटांचाही जमिनीचा तुकडा त्यांच्या नावावर कुठल्याही गावात नाही. हजारो वर्षांपासून भारतात राहुनही या इरुआलांना सरकारी ओळख नाही, मतदार यादीत नाव नाही. मतदार यादीत नाव नाही म्हणुन रेशनकार्ड नाही; आणि रेशन कार्ड नाही म्हणुन मतदार यादीत नाव नाही.   


      मतदार यादीत नाव नोंदवा अशी या आदिवासींनी चुकून कधी मागणी केली की गावचा सरपंच म्हणनार की ' वा! म्हणजे निवडणुक आली की आम्ही आधीच नको त्यांच्याही पाय पडतो असतो, आता तुमच्यादेखील पाया पडायचे का? वा!'


     गावाबाहेर रहाणाऱ्या गरिब आदिवासी राजाकुन्नीला आणि त्याच्या दोन नातेवाईकांना त्यांनी गावात न केलेल्या एका चोरीसाठी पोलिस पकडून नेतात आणि न केलेला गुन्हा कबुल करावा म्हणुन बेदम मारहाण करतात. राजाकुन्नीची बायको सेन्गेनी धिरोदत्तपणे नवऱ्याच्या सुटकेसाठी हायकोर्टात वकीलाच्या मदतीने जे काही करते व सोसते ते सर्व पहाताना व पोलिसांच्या नीच कारवाया पहाताना डोळे विस्फारतात आणि मेंदू सून्न होऊन जातो आणि चित्रपट पहाणे बंद करावे असे वाटू लागते. 



      तामिळनाडूत १९९०-९३ च्या आसपास हायकोर्टात खरोखरंच लढला गेलेला, रखडलेला, गाजलेला हा खटला आहे. त्या खटल्यात न्याय देणाऱ्या मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधिशापैकी एका न्यायाधीशांनी एका मुलाखतीत सांगीतले होते की या प्रकरणात पोलिसांनी केस मागे घेण्यासाठी सेन्गेनीला लाच द्यायचा प्रयत्न तर केलाच पण त्यांना स्वतःला व सेन्गेनीच्या वकिल चंद्रू यालाही लाच देऊ करुन विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.



       चित्रपटातील एका प्रसंगात कार्ल मार्क्सच्या प्रभावाने भारलेला वकील चंद्रू जो नायक आहे; तो अन्य एका अस्पृष्य जातीची केस रस्त्यावर लाल झेंड्याच्या मोर्चाद्वारे लढत असताना त्याला स्वातंत्र दिनानिमित्त निघालेल्या एका मिरवणूकीत जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद वगैरे स्वातंत्र्य लढ्यातील नायकांचे रुप घेतलेली बालके दिसतात. त्यांना पाहुन ' यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रुप घेतलेले बालक उभे करावे असे कुणालाही का बरे वाटले नसावे?' असा प्रश्न करतो तेव्हा खाडकन् मुस्काटात मारल्यासारखे आपणही सटपटतो आणि आपणदेखील अजुनही जातीयवादीच आहोत याची आपणास जाणीव करुन देतो. 



       अस्पृष्य आदिवासींना गुन्हा कबुलीसाठी चित्रपटातील पोलिसांनी केलेली मारहाण तर इतकी अमानुष आणि न पहावणारी आहे, की पोलिस खरोखरंच अशी माराहाण करतात का असा आपल्याला प्रश्न पडतो. 


      या चित्रपटातील कलाकार पट्टीचे कलाकार आहेत. सुर्या नावाचा दाक्षिणात्य कलाकाराने सेनेगतीला न्याय मिळवून देताना चंद्रू नावाच्या वकिलाच्या भूमिकेत जी कमालीची तळमळ देहबोलीतून दाखवली ती लाजवाब आहे. चित्रपटाचा नायक म्हणुन त्याने कोणतीही स्टाईलबाजी केलेली नाही हे उल्लेखनीय ठरावे. इतर कलाकारांनी ते जणुकाही आदिवासी जमातीमधीलच असावेत असे वाटावे इतका जबरदस्त अभिनय केला आहे. 



     दिग्दर्शन सुपर्ब, एकही फ्रेम विनाकारण रेंगाळणारी नाही असे वेगवान सफाईदार दिग्दर्शन. कलादिग्दर्शक व मेकमन हे पारितोषिकांचे मानकरी ठरावेत इतके जबरदस्त आहेत.

    सिनेमाटोग्राफी इतकी जबरदस्त आहे की सिनेमाटोग्राफर हा देखील कॅमेऱ्यामागील हिरोच आहे असे म्हणायला हरकत नाही.


     सैराट या चित्रपटामुळे आपल्याला एक नागराज मंजुळे ग्रेट वाटत असतो; पण दाक्षिणात्य चित्रनगरीत पावला पावलांवर असे अनेक मंजुळे आहेत हे या आधीचे दाक्षिणात्य चित्रपट पहाताना तयार झालेले मत हा चित्रपट पहाताना आणखीनच पक्के होते. 



    चित्रपटात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सरळ उल्लेख कुठेही फारसा नसला तरी बाबासाहेब ज्या प्रश्नांना आयुष्यभर प्राणपणाने भिडले, त्या प्रश्नांची दाहकता आज थोडीफार कमी झाली असली, तरी ते प्रश्न आजही चटके बसण्याइतके धगधगतच आहेत हे साऱ्या चित्रपटभर जाणवत रहाते.


     भारतीय राज्य घटना अंमलात आल्यानंतरही आज अस्पृष्य, आदिवासी, फासेपारधी, भटके, केसांवर फुगे देणारे, सुया दोरे बिब्बे विकणारे, विमुक्त, बोकेधरी यांच्याकडे भारतीय नागरीक म्हणुन स्वतःची ओळख दाखवणारी कागदपत्रे नाहीत हे फार क्लेशदायक आहे. अशा वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वचनाची आठवण येते, ते म्हणाले होते की " घटनेत सर्व घटकांची काळजीपूर्वक काळजी घेतली आहे यात कसलीही शंका नाही, परंतु घटना राबवणाऱ्यांनी मात्र घटना काळजीपूर्वक राबवायला हवी "


      हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही अस्वस्थ झाला असाल, तर लक्षात घ्या की तुम्ही जिवंत माणूस आहात याचा तो निखळ संकेत असेल. 

   हा तामिळ चित्रपट हिंदीत डब केलेला आहे, तोच पहाणे उत्तम.

 ग्रेट चित्रपट.




- स्वप्नील भालेराव , मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)