दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती..

शालेयवृत्त सेवा
0

 



     अथांग पसरलेल्या सरोवराच्या किनारी बसल्यावर त्या निळाशार डोहात न्याहाळताना तो डोह शांतपणे आपले प्रतिबिंब पाहू देतो ..... असेच काही व्यक्तींचे जीवन अविचल, निश्चल,सुखद लहरींनी व्यापून टाकलेले असते . माझ्या शिक्षकी पेशाला आता एकोणतीस वर्षे पूर्ण झाली आहेत . सहा मुख्याध्यापकांच्या सोबत काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. प्रशासकीय कामे, अध्यापन विषयक मार्गदर्शन लाभले आणि आता सहाव्या क्रमांकावर असलेले माझ्या कन्या शाळेचे मुख्याध्यापक ,भोकरच्या शैक्षणिक वर्तुळात ' अण्णा 'या नावाने प्रसिद्ध , चिरपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर वसंतराव सुरंगळीकर एकतीस डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.


       श्री 'अण्णा' यांना सर म्हणणे किंबहुना साहेब म्हणणे म्हणजे आम्हा सगळ्यांनाच अवघड जाते, नव्हे आम्ही त्यांना ' अण्णा 'या नावानेच बोलत असू. 'अण्णा' या नावाची माझ्या खासगी जीवनाचा सुद्धा एक संबंध आहे ते म्हणजे माझे 'बाबा' . माझ्या बाबांनाही सगळेजण 'अण्णा' म्हणत असत. बाबांचे अक्षर देखील अण्णांच्या अक्षराप्रमाणे सुंदर होते .म्हणूनही एक आपलेपणा वाटतो.


           'अण्णा' म्हणजे संयमी वृत्ती, अजातशत्रू ,शांतीब्रह्मच जणू... .... अण्णांच्या व्यक्तिमत्त्वात सालसपणा, ऋजुता, वाणीत गोडवा, माधुर्य आहे तसेच त्यांना 'देवमाणूस' म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही. सुंदर अक्षरांचे धनी असलेले 'अण्णा' कुठलाही अहवाल असो ते सुवाच्य ,स्पष्ट अक्षरात लिहिलेले असते. अण्णांनी तालुक्याचे प्रशासन एकतर्फी चालवले पण तालुकाच नव्हे तर त्यांच्या सहवासात आलेले प्रत्येक गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी हे अण्णांच्या बाबतीत गौरवोद्गार काढतात .एकही जण दुखावला गेला नाही, नाराज झाला नाही. ह्यावरून मला आलेला एक अनुभव सांगते अगत्याचे वाटते . एकदा माझे गाईडचे प्रशिक्षण नांदेडला होते .मी अण्णांना परवानगी मागितली. आमच्या शाळेत पथक नसल्यामुळे मला जाता आले नाही पण दुस-या दिवशी 'अण्णा' म्हणाले की, आपण मॅडमला नाराज केलो .हे ऐकून मी खूपच भारावून गेले. म्हणजेच अण्णांकडून कधीच, कोणत्याच व्यक्तींना शाब्दिक बोच किंवा मन दुखावेल असा साधा ओरखडा देखील त्यांच्या वागण्या-बोलण्यात नसतो.


भीतीयुक्त आदर ...व आदरयुक्त भीती या दोन्हीतून निवड करायची असल्यास 'आदरयुक्त भीती' ही अण्णांच्या बाबतीत निवड करावी लागेल. काही व्यक्तिमत्वे अशी असतात ती पाहताक्षणीच आदर निर्माण व्हावा .


शुद्ध ,सात्विक व वात्सल्य या त्रयींचा संगम अण्णात आढळतो. मुख्याध्यापक म्हणजे 'शाळा' या कुटुंबाचा 'आधारवड' असतो. विकास कार्याचा मुख्य स्त्रोत असतो .विविध कल्पना त्यांच्या मनात रुंजी घालत असतात.काही पूर्ण होतात, काही अर्धवट असतात तर काही होत नाहीत.


  यावरून आठवलं मला जेव्हा विषय शिक्षक म्हणून कन्या शाळा मिळाली तेव्हा मला सगळे जण म्हणाले की, त्या शाळेत 'अण्णा' मुख्याध्यापक आहेत ना... मग तुम्हाला काहीच टेन्शन नाही. खरोखरच मला ते अनुभव आजतागायत आले .कधी अडीच वर्ष निघून गेले कळालेच नाही.अण्णांनी कधीही 'ना' चा पाढा वाचलाच नाही. प्रबलन , प्रोत्साहन व सहकार्य हे सातत्याने देत राहिले .घरातला कर्ता माणूस ऊर्जावान, सृजनशील व प्रेरक असला की त्या घरात प्रकाशमान,कार्यक्षम प्रतिभा व प्रतिभावंत घडतात.. असेच आमच्या कन्या शाळेचे स्वरूप आहे . 


      मंगेश पाडगावकरांच्या ओळी मला इथे आठवतात 'अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती! याप्रमाणे 'अण्णा' हे आमचे 'कर्तेधर्ते 'आहेत. पणआता नियत वयोमानानुसार हे कर्तृत्व आता थांबणार आहे . आपल्या 'सेकंड इनिंग 'साठी वेगळ्या म्हणजे सेवानिवृत्तीनंतरच्या काळासाठी ,त्यांना पुढील आयुष्यात निरामय आरोग्य लाभो, हीच मनोकामना व्यक्त करते!

           

- सौ. कांचन जोशी

कन्या शाळा, भोकर जि.नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)