नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ मराठवाडा विभागाच्या वतीने माहूर येथील आनंददत्त धाम येथे एक दिवशी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसुरकर संमेलनाध्यक्ष होते. तर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे उपस्थित होते.
तिसऱ्या सत्रात डॉ. विलास ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. सहभागी कथाकारांनी एकापेक्षा एक सरस कथा सादर करून रंगत वाढवली. सर्वप्रथम प्राजक्ता लांडे यांनी "ऍडजेस्टमेंट" ही कथा अति लघू प्रकारातील सांगून एकमेकांच्या सहवासात राहताना समजून घेतले पाहिजे हा आशावाद कथेतून सांगितला. प्रल्हाद जोंधळे यांनी "बिब्बे" ही चित्तवेधक कथा सांगून आपल्या अनुभव अनुभूतीचे दर्शन घडविले. तर सुप्रसिद्ध कथाकार वीरभद्र मिरेवाड यांनी "देव्हारा" ही सामाजिक आशयाची कथा सांगून बाप आणि मुलामधील संवाद उजागर केला. व्यसनी बाप आणि संस्कारित मुलगा यांच्यातील शाब्दिक खंडाजंगी घडवून आणत शेवटी मिरेवाड यांनी श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभा केले.
कथाकथन सत्राचे अध्यक्ष विलास ढवळे यांनी "बबन्या उगं न्हवं " ही कथा प्रेमावर आधारित कॉलेज जीवनातील सादर केली. रसिकांनी कथेला डोक्यावर घेतले. प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या घेत या कथेने सभागृह डोक्यावर घेतले. यावेळी कथाकथन सत्राचे अध्यक्ष डॉ. विलास ढवळे, सुप्रसिद्ध कथाकार वीरभद्र मिरेवाड, प्रल्हाद जोंधळे, प्राजक्ता लांडे, स्तंभलेखक उत्तम कानिंदे यांचा हृदय सत्कार स्वागताध्यक्ष तथा गटशिक्षणाधिकारी रविंद्र जाधव आणि संमेलनाचे निमंत्रक तथा मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केला. कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन सुरेशकुमार शेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अरुण धकाते यांनी मानले. याप्रसंगी संयोजक शेषराव पाटील, राजेंद्र चारोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम राठोड, दिंगबर जगताप, गौतम सावंत, अरुण धकाते, धनंजय गिर्हे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सुधीर जाधव, सागर चेक्के , विजय घाटे, सुरेश शेरे, विनोद सुरोशे, फाल्गुनी ढवळे, भाग्यवान भवरे, भोला सलाम, प्रविण वाघमारे, अविनाश सिंगणकर, आदिनी विशेष परिश्रम घेतले.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .