शिक्षण विभागाचा उपक्रम; मुलांमध्ये होणार पर्यावरण प्रेमाची बीजे !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून चालू शैक्षणिक वर्षात 'एक पेड मा के नाम ' हा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 49 हजार 280 विद्यार्थी आपल्या आईच्या नावाने झाडे लावणार आहेत. त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा भावनिक सहभाग वाढवला जाणार आहे.
या उपक्रमाचे मुख्य उद्देश केवळ वृक्ष लागवडी पुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयी प्रेम, आदर व जबाबदारीचे भावना निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. आई व धरती या दोन्ही मतांचा सन्मान व त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा सर्जनशील मार्ग म्हणून वृक्षारोपण या माध्यमातून निवडण्यात आले आहे. या मोहिमेसाठी वन विभागाचे साथ लाभणार आहे. वड, पिंपळ, कडुनिंब, बॉम्बे पिंक, अर्जुन यासारख्या स्थानिक व उपयुक्त वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहकार्याने आवश्यक झाडाची उपलब्धता निश्चित केली जाणार आहे.
5 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान नियोजन :
▪️या उपक्रमाचे औपचारिक सुरुवात पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण करावयाचा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या आवाहनानुसार सर्व शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 3704 शाळांचा सहभाग :
▪️जिल्ह्यातील सर्व 3704 शाळांमधून सुमारे अडीच लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण विभागाने या उपक्रमाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी सखोल नियोजन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .