नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल; शिक्षण विभागाचा निर्णय !
अमरावती ( शालेय वृत्तसेवा ) :
शालेय अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावीचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक सत्र सन २०२६-२७ मध्ये बदलणार असून, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये टप्प्याटप्याने हा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून सेतू अभ्यास पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसतखेळत कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.
नव्या धोरणानुसार पारंपरिक प्रणालीऐवजी बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षणाची अखंड साखळी तयार केली आहे. बालवयातील शिक्षण, मूल्यमापन,पारंपरिक प्रणालीऐवजी बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षणाची साखळी पाठ्यपुस्तक निर्मिती आणि शिक्षक प्रशिक्षण या सर्व पातळ्यावर अभ्यासक्रमात बदल होणार आहे.
नवीन अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांना सहज जुळवून घेता यावे यासाठी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सेतू अभ्यास पुस्तिका तयार केली जात आहे. शिक्षण विभाग या पुस्तिकेच्या माध्यमातून शिकवण्याची पूर्वतयारी करत आहे. शासनाने शिक्षणाची बालवर्ग ते दुसरी (पूर्व प्राथमिक), तिसरी ते पाचवी (प्राथमिक), सहावी ते आठवी (माध्यमिक), आणि नववी ते बारावी (उच्च माध्यमिक) अशी विभागणी केली आहे. या बदलांमधून विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर भर दिला जात आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) व राज्य परिषदेच्या पुढाकाराने आता नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, आनंददायक, समावेशी आणि मूल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. संख्याज्ञान, भाषा, तार्किक विचार, जीवनकौशल्ये, सर्जनशीलता आणि स्थानिक गरजांनुसार विषयवस्तू समाविष्ट केली जाणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार केंद्रस्तरीय अभ्यासक्रमाचा राज्याभिमुख वापर होणार आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, समग्र मूल्यांकन पत्रक सेतू अभ्यासक्रम तसेच शालेय वेळापत्रक व सत्र प्रणालीत बदल केले जातील.
असा बदलणार अभ्यासक्रम :
सन २०२६-२७ : दुसरी, तिसरी, चौथी, सहावी
सन २०२७-२८: पाचवी, सातवी, नववी, अकरावी
सन २०२८-२९ आठवी, दहावी, बारावी


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .