जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा !

शालेयवृत्त सेवा
0

 





गडचिरोली ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असलेली पदे भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, टीईटी उत्तीर्ण शिक्षकांमधून पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या ८० शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी मंगळवारी, १० मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केली जाणार आहे.


प्रशासकीय कामाचा अनुभव आणि टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना या प्रक्रियेद्वारे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी या महत्त्वाच्या पदांवर बढती दिली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पदोन्नतीची प्रतीक्षा शिक्षक वर्गाला होती. या पदोन्नतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. लवकरच मिळणार नियुक्ती रिक्त पदांमुळे शालेय आणि प्रशासकीय कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ही पदोन्नती प्रक्रिया राबवली जात आहे.


पात्र आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांना लवकरच नियुक्ती दिली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिक्षण विभागाने ८० शिक्षकांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले आहे. मात्र नेमक्या जागा किती हे स्पष्ट केले नाही.


अधिकारी करणार कागदपत्रांची तपासणी


शिक्षण विभागाने तयार केलेल्या सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेच्या यादीनुसार ८० शिक्षकांना पडताळणीसाठी पाचारण करण्यात आले आहे. १० मार्च रोजी होणाऱ्या या तपासणीमध्ये शिक्षकांचे नियुक्ती आदेश, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्रे आणि टीईटी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र यांची पडताळणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाईल.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात यावी, यासाठी शिक्षक संघटनांनी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.


शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग 3 मोकळा झाला आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदावर पात्रतेसाठी वेगवेगळे निकष लावले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदे भरल्याने पर्यवेक्षिय यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)