रितिका राजेश मुंगल हिने ISSC 2026 या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश..

शालेयवृत्त सेवा
0

 


जिजामाता प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिजामाता प्राथमिक शाळेची इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रितिका राजेश मुंगल हिने ISSC 2026 या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत “Best Performer” हा मानाचा किताब प्राप्त केला आहे. तिची ISSC Grand Finale साठी निवड झाल्याने शाळा, पालक, शिक्षक तसेच संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनीच्या या यशामुळे जिजामाता प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 


ISSC 2026 ही देशभरातील विद्यार्थ्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी, सामान्यज्ञान, बौद्धिक क्षमता, तार्किक विचार आणि कौशल्यांची चाचणी घेणारी प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर रितिकाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून “Best Performer” म्हणून विशेष मान मिळवला आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. 


स्पर्धेच्या पुढील टप्प्यात देशभरातील निवडक विद्यार्थ्यांमधून Top 17 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून या अंतिम फेरीत निवृत्त वरिष्ठ ISRO शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन Live Quiz Finale पार पडणार आहे. रितिकाची या Grand Finale साठी निवड झाल्यामुळे तिच्या यशात आणखी भर पडली आहे. 


विशेष म्हणजे, या स्पर्धेमधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना NASA Educational Experience Program अंतर्गत अमेरिकेतील NASA Tour साठी जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रितिकाला विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय अनुभव घेण्याची संधी मिळणार असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. 


या यशामागे विद्यार्थिनीचे अथक परिश्रम, पालकांचे प्रोत्साहन तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. श्रीज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री विलास पाटील कल्याणकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, शाळेचे मुख्याध्यापक श्री देवठाणकर सर यांचे सहकार्य तसेच सौ. आर. एम. भोसले मॅडम, सौ. के. आर. दरबस्तवर मॅडम आणि श्री एस. के. भोसले सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे रितिकाला हे उल्लेखनीय यश संपादन करता आले आहे.


रितिकाच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती अशीच यशाची नवी शिखरे सर करो आणि शाळेचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)