अक्षर परिवाराचा उपक्रम.. यशाबद्दल बक्षीस म्हणून मिळाली नवी कोरी सायकल..

शालेयवृत्त सेवा
0

 


 डॉ. उज्वला अवधूत मस्के व तिचे पालक अवधूत पाटील मस्के यांच्या वतीने प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीनीला दिली सायकल भेट . .

क्षण आनंदाचा, क्षण अभिमानाचा, क्षण गौरवाचा, क्षण निस्वार्थ त्यागाचा !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर या ठिकाणी आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शासन आदेशाप्रमाणे शाळेमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर व नेटके आयोजन करण्यात आले यावेळी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या बालकांचा सुंदर असा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. अक्षर परिवारातील संस्काराप्रमाणे नित्यनेमाने सर्वात वरच्या वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थिनी अन्वी साधना अक्षय ढोके हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते इयत्ता पाचवी वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षिसाचे अर्थात नव्या कोऱ्या सायकलचे. गावातील पहिली महिला डॉक्टर असणारी कुमारी उज्वला अवधूत मस्के व तिचे पालक अवधूत पाटील मस्के यांच्या वतीने पाचवी वर्गातील सर्वगुणसंपन्न आणि सर्वात हुशार विद्यार्थ्याला सायकलचे बक्षीस देण्याचे नियोजित असल्याने आज शिकाऊ डॉ. उज्ज्वला आणि तिचे वडील अवधूत पाटील मस्के यांच्या हस्ते इयत्ता पाचवी वर्गातील अन्वी साधना अक्षय ढोके हिला सायकल बक्षीस देण्यात आले. 



परंतु अत्यंत हुशार आणि संवेदनशील असणाऱ्या अन्वी हिने सायकलचे बक्षीस तिचे आई वडील शिक्षक असल्याने घरी असणारे अनुकूल शैक्षणिक वातावरण, खासगी शिकवणीची उपलब्धता आणि वेळोवेळी उपलब्ध असणाऱ्या इतर शैक्षणिक सुविधा यांची अधिकची विशेष सोय स्वतःला मिळत असल्याने आणि इतरांना ती मिळत नसल्याने ही स्पर्धा बरोबरीची तसेच निकोप होऊ शकत नसल्याचे निरीक्षण नोंदवत सायकलचे बक्षीस कुठल्याही शैक्षणिक सुविधा नसतानाही दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या दुर्गेश्वरी स्वाती संतोष मस्के हिला देण्याची विनम्र परवानगी डॉ. उज्ज्वला आणि अवधूत पाटील मस्के यांना मागितली. त्यास त्यांनी होकार देत सायकलचे बक्षीस दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या दुर्गेश्वरी स्वाती संतोष मस्के हिला प्रदान केले .


यावेळी गावचे सरपंच दिगंबर पाटील करडीले, दत्ता पाटील करडीले, संजय पाटील करडीले, अवधूत पाटील मस्के, संतोष पाटील मस्के, मारोती पाटील करडीले, सदाशिव पाटील करडीले, चंद्रकांत पाटील करडीले, पांडुरंग पाटील करडीले, महेश पाटील मस्के, शिवराज पाटील करडीले, सूर्यकांत पांचाळ, अंगणवाडी ताई ललिताबाई करडीले, डॉ. उज्ज्वला मस्के, सहशिक्षिका धम्मदिना सोनकांबळे आणि मुख्याध्यापक अक्षय ढोके यांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)