"आग्यामोहोळ" संयत विद्रोहाचा ज्वलंत आविष्कार.. चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र)

शालेयवृत्त सेवा
0



मराठवाड्यातील पालम जि.परभणी येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांच्या स्वयं प्रकाशन,पुणे निर्मित बहुप्रतिक्षित "आग्यामोहोळ" ह्या मराठी गझलसंग्रहाचे नुकतेच रविवार, दि.27/09/2026 रोजी कवन व गझलरंग संस्था आयोजित..दिमाखदार सोहळ्यात पुणे येथे 'गझलरंग'चे सर्वेसर्वा शाहीर सुरेशकुमार वैराळकर (अण्णा),नाना लोडम,दगडूदादा लोमटे व मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात प्रकाशन संपन्न झाले.


"स्वयं प्रकाशन" सारख्या दर्जेदार प्रकाशनामार्फत निर्मित या दमदार गझलसंग्रहात एकूण 89 मराठी गझला समाविष्ट आहेत.सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांचे समर्पक व बोलके मुखपृष्ठ व शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांची नेटकी प्रस्तावना गझलसंग्रहास लाभली आहे.उर्मिला बांदिवडेकर (माई),नितीन देशमुख,आत्माराम जाधव यांचे शुभेच्छासंदेश संग्रहाची वाचनीयता वाढवतात.गझलकार आत्तम गेंदे यांनी प्रस्तुत संग्रह आपल्या जन्मदात्री सौ.चंद्रकला वामनराव गेंदे यांच्या स्मृतींना समर्पित केला असून यातून त्यांची मातृभक्ती प्रतीत होते.आपल्या मनोगत व ऋणनिर्देशात त्यांनी स्वतःची गझलविषयक वाटचाल, सहकारी मित्रपरिवार,मार्गदर्शक, पुरस्कार इ.चा थोडक्यात आढावा घेतला आहे.


मराठवाड्यासारख्या दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात हिरव्यागार किंवा गुलाबी कविता लिहिणारे कवी,साहित्यिक तसे दुर्मिळच!पेशाने जि.प.शिक्षक असलेल्या,बहुजन समाजातून पुढे आलेल्या आत्तम गेंदे यांना भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना बहाल केलेल्या सामाजिक स्वातंत्र्याचे भान आहे.त्यामुळे त्यांची गझल जितकी रसिकांना गुदगुल्या करते तितकीच नकळतपणे कान टोचण्याचेही काम करते.


अशी लागली हृदयावरती गझलेची ओळ पुन्हा

जागे झाले हृदयामधले 'आग्यामोहोळ' पुन्हा


"आग्यामोहोळ" हे हटके शीर्षक असलेल्या गझलसंग्रहाचा संदर्भ असलेला दमदार शेर असलेली पहिलीच गझल व अंतर्मुख करणारे अनेक शेर वाचकांचे लक्ष वेधून घेतात.


जिथुन सुरुवात झाली 'ती' तुझी शाळा कुठे आहे?

तुला माहीत आहे का 'भिडेवाडा' कुठे आहे?


कशा गेल्या 'फुले' विसरून सावित्री तुझ्या लेकी?

पुन्हा बसल्या दगड मांडून सावित्री तुझ्या लेकी


क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व भारताच्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जाज्वल्य कार्याचा व विचारांचा आजच्या पिढीला पडत चाललेला विसर अधोरेखित करणारे असे सणसणीत शेर व्यवस्था तसेच समाजाचीही कानउघाडणी करण्याचे काम चोखपणे बजावतात.


कसे होईल बापाचे जगाला का भिती असते

मुलीचा जन्म म्हणजे तर सुखाची 'शाश्वती' असते


दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई

का मग मलाच दिसतो 'विठ्ठल' तुझ्यात आई?


हे आठवते,ते आठवते,हे मी तुलाच सांगत होतो

'तुझी आठवण येते' आई,हे मी कुणास सांगू आता?


एक अप्सरा घराभोवती हिंडत असते

पण आईला सटवी दिसते येता-जाता


माझ्याहुनही गोरी गोरी होती माझी आई

मला सावली करताना ती काळी झाली होती


आई,लेक अशा नातेसंबंधांवरचे यासारखे अनेक शेर कधी नकळत पापण्या ओलावतात कधी चेहऱ्यावर खट्याळ हसू आणण्याचेही काम करतात.येता-जाता..रदीफ असलेल्या सिग्नेचर गझलेतील त्यांचे अनेक शेर रसिकांना तोंडपाठ आहेत..एका शेरातील 'सटवी' हा शब्दप्रयोग मराठवाड्यातील बोलीभाषेचा उत्तम नमुना ठरतो.


काय सांगू काय पिकते कोरड्या शेतामधे?

कापसाला आमच्या केवळ पऱ्हाटी लागते


केवळ निवडणुकीच्या काळामध्ये विकास पिकतो

या देशाला त्यांनी कोरडवाहू वावर केले


जगाचे पोषण करणाऱ्या कास्तकाराची क्रूर थट्टा करणाऱ्या व्यवस्थेवर आसूड ओढण्याचे काम आत्तम गेंदे अशा शेरांमधून करतात.


मी सूर्याचा वंशज आहे

म्हणुन काजवा झालो नाही


अटीतटी आणि भानगडीत वाया गेली

अपुली चळवळ चढाओढीत वाया गेली


कष्टकरी,शेतकरी,विद्यार्थी अशा अनेकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी विद्रोहाची वाट धरावी लागते..परंतू एकतेची वज्रमूठच व्यवस्थेला वठणीवर आणू शकते..असा मोलाचा संदेश असे शेर देतात.


तिला बघताक्षणी होते गुलाबी लेखणी माझी

मला काहीच विद्रोही सुचत नाही असे नाही


हळदीने तर जुनी जखमही लवकर भरली जाते

म्हणून येथे लग्नाआधी हळद लावली जाते


असे सिग्नेचर शेर..आत्तम गेंदे यांचे अचूक निरीक्षण दाखवण्यास पुरेसे आहेत.गझलकार हा उत्तम कवी का असावा लागतो ते अशा शेरांमधून प्रत्ययास येते.


गुंड,मवाली किंवा कुठला दादा नाही

पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही


दुधाची साय नाही की,तुपाची धार नाही मी

कडू आहे नवे औषध,तुला पचणार नाही मी


असे शेर व्यवस्थेला न पचणारा, महाकवी वामनदादा कर्डकांचा वारसा सांगणारा,उपेक्षितांची बाजू घेणारा, मानवी हक्कांचा पुरस्कार करणारा, भारतीय संविधानाला सर्वस्व मानणारा नवा विद्रोह..एल्गार घेऊन आल्याचे द्योतक आहेत.


माझे,तुझे,तिचेही माणूस नाव आहे

जातीवरून इतका का मग तणाव आहे?


आडनावांची कशाला बनविता यादी वगैरे

शोधल्या जातील मग आपापल्या जाती वगैरे


एखादे अक्षर गिरवावे तशी गिरवली जाते

जन्मापासून आपापली जात शिकवली जाते


जात बदलणे पक्ष बदलण्याइतके आता सोपे व्हावे

कोणालाही सहज कुठेही प्रवेश करता यावा आता


कायम अमुच्या पाठीवरती ढाली होत्या

कारण,त्यांच्या दगाबाज तलवारी होत्या


आटपाट नगरात कधी नाहीत गुंतल्या

आमच्या कल्पनाही वास्तववादी होत्या


अशा शेरांमधून सहजपणे आलेली दैववाद,कर्मकांड,पोथीपुराण,धर्म,जातीपाती व कल्पनाविश्वात न रमता स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवण्यास सांगणारी वास्तववादी विचारसरणी, माणसाला माणूस समजायला सांगणारे तत्वज्ञान वाचकांना पानापानावर अंतर्मुख करते.


लोक घेतील येथे तुझीही दखल

वाजले पाहिजे फक्त नाणे तुझे


व्यवस्थे एवढे लादू नको निर्बंध माझ्यावर

दगड हातात घेण्याची मलाही व्हायची इच्छा


जे काही अस्सल असते तेच काळाच्या कसोटीवर टिकते."फँड्री" मधील 'जब्या' जसा व्यवस्थेविरोधात बंड करताना नकळत हातात दगड घेतो.. तसाच एल्गार आत्तम गेंदे यांची लेखणीही करू पाहते व न्याय्य हक्कांची मागणी करते.


माळरानीही पिकाया लागल्या आहेत गझला

शुद्ध होते केवढे तू पेरलेले दोन मिसरे


गझलसम्राट सुरेश भट,महाकवी जलसाकार वामनदादा कर्डक यांसारख्या मानवतावादी विचार पेरणाऱ्या समाज प्रबोधनकारांविषयी असे शेर कृतज्ञता व्यक्त करतात.विजा घेऊन येणारी पिढी मराठी गझल अटकेपार नेईल याची शाश्वतीही देतात.


एकदाही लागली नाही उन्हाची झळ मला

पाजली 'चवदार' पाण्याची अशी ओंजळ मला


स्पर्श केला मी तुला अन शुद्ध झालो गौतमा 

लागल्याने हात माझा बाटला नाहीस तू


'युद्धाने जग जिंकू शकतो' या ज्ञानाचे काय करू मी

बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी?


भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी युगानुयुगे मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या समाजाला माणूस बनवले व समतेचा विचार पेरणाऱ्या महात्मा गौतम बुद्धाच्या सदधम्माची वाट दाखवली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध या दोन्ही महामानवांची मानवतावादी विचारसरणी ह्या गझलसंग्रहाचा गाभा आहे.


गाव,राज्य व देश पातळीवरील असंख्य गझल संमेलने, मुशायऱ्यांमधून हक्काचा रसिकवर्ग मिळवलेल्या दमदार गझलकार आत्तम गेंदे यांचा "आग्यामोहोळ" हा प्रस्तुत गझलसंग्रह अतिशय दर्जेदार, वाचनीय व संग्रही असा झाला आहे. नवनवीन हटके रदीफ,आशयघन शेर,गझला असणारा हा प्रयोगशील गझलसंग्रह भविष्यात शाळा, महाविद्यालये,तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमांमधून समाविष्ट होण्याची खात्री वाटते.अतिशय माफक दरात उपलब्ध झालेल्या या गझलसंग्रहाचा सर्व गझलरसिक,वाचकांनी पुन्हा पुन्हा नक्की आस्वाद घ्यावा.


★आग्यामोहोळ (मराठी गझलसंग्रह)

★गझलकार:- आत्तम गेंदे (9420814253)

★स्वयं प्रकाशन,पुणे

★मूल्य:- 200/-

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)