महाराष्ट्र राज्य शासनाच्या बालकवी पुरस्कारासह राज्यस्तरीय एकूण १४ पुरस्कार मिळालेल्या 'सुंदर माझी शाळा' या बालकवितासंग्रहाचे कवी श्री गणेश घुले यांची #झाड ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीतील कथानक हे वडाच्या झाडाभोवती फिरताना आढळून आलेले आहे. विशेषत: ही कादंबरी किशोरवयीन मुलांना समोर ठेऊन लिहिली आहे. वडाचे झाड हे एका शाळेच्या आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे. वडाचे झाड हे त्यातील मुख्यपत्र आहे, असं असलं तरी या कादंबरीमध्ये अनेक कंगोरे असे आले आहेत की माणसाला आत्मचिंतन करायला भाग पाडतात. वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करताना ही त्यात वेगळीच मजा आहे. कादंबरीचे वैशिष्ट्य असं आहे की ती एकदा हातात घेतल्यानंतर संपल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही, हे लेखकाच्या मांडणीचे यश आहे. ही कादंबरी जेव्हा मिळाली, तेव्हा मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर आमच्या शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसून पूर्ण कादंबरी वाचून काढली. चिंचेच्या झाडाचा जन्म हा माझ्या जन्माच्या अगोदरचा!माझं बालपण या झाडाच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेले. त्यामुळे मला त्या चिंचेच्या झाडात या कादंबरीतील वडाचे झाड दिसते.
गावातील शाळेला जागा दिलेली आहे नंदा आजीच्या सासऱ्यांनी! नंदा आजी त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसते आणि आपलं गाह्राणे झाडाकडे मांडते. वारकरी विठ्ठलाकडे आपले म्हणणे मांडतो तशी नंदा आजी झाडाला बोलते. यात झाडाला विठ्ठलाची उपमा देऊन लेखकाने झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तिचा मुलगा हा बाहेर शहरात नोकरीला आहे आणि त्याची बरेच दिवसापासून भेट नाही. त्यामूळे तिची नातवंडे तिला अजून पाहायला मिळालेली नाहीत. तेव्हा ती आपलं आत्मकथन वडाच्या झाडाला सांगत असताना एक वाक्य बोलते, "नातवंडांची आठवण आली की शाळेतल्या लेकरांकडे एकटक बघत बसते" यावरुन एक वाटते की माणसाने इतकंही विकासाच्या मागे लागू नये की त्यात जन्मदात्यांचा विसर पडावा.
शाळेमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाषणात म्हणाले, "मी माझ्या जीवनात जे काही चांगलं काम केलं आहे, जे काही नाव कमावलं, ते केवळ शाळेमुळे." या वाक्यातून लेखकाने शिक्षणाचे आणि शाळेचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि हे नकळत पणे किशोरवयीन मुलांच्यावर शिक्षणाचं महत्त्व बिंबवलं जातं. या कादंबरीत आलेली चित्रे ही काल्पनिक नसून प्रत्यक्ष फोटो जमा करून त्या फोटोंचे स्केच केलेले आहेत. या कादंबरीमध्ये पठाण सर नावाचे एक ह्रद्य पात्र आलेले आहे. विशेषत: यामध्ये त्या पठाण सरांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थ्यांसोबतचे माझे दोन फोटो आलेले आहेत. मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार शशी शेट्ये यांना लेखकांनी जवळपास पन्नासपेक्षा अधिक शिक्षकांचे फोटो पाठवले होते, त्यातून त्यांनी फोटोंची निवड केली आणि माझ्या फोटोंमध्ये त्यांना एक शिक्षक दिसला, ही माझ्यासाठी फार मोठे उपलब्ध आहे. ते पठाण सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना एक वाक्य उच्चारतात, "ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीचे ऋण आपण फेडलंच पाहिजे." हा संस्कार वाचकांच्या मनावर नकळतपणे कोरला जातोय, हे फार महत्त्वाचे आहे.
शाळेच्या बाजूलाच एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातील दानपेटी एके दिवशी चोर उचलून नेतात, असा एक प्रसंग आलेला आहे या प्रसंगान्वे एक मुलगा त्याच्या आईला विचारतो, "आई, देवाला तर सारं कळतं. देव तर शक्तिमान असतो. मग देवाने का नाही अडवलं चोरांना ?" हा विचारातून लेखकाला वाचकांचा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करावयाचा आहे. आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नये हा दृष्टिकोन मुलांचा लहानपणापासूनच विकसित झाला तर पुढे अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचं स्तोम वाढणार नाही आणि भोळीभावडे लोक लुटली जाणार नाहीत, हा कळवळा लेखकाच्या या मांडणीतून दिसून येतो. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वर्गणी जमा केली व मंदिराला सुरक्षित संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार बांधून घेतले. गावकऱ्यांची ही तत्परता शाळेसाठी सहसा आढळत नाही. असे लेखकाने सूचवले आहे.
मस्जिद किंवा मंदिरावर लावले जाणारे भोंगे, त्यातून होणारे ध्वनी प्रदूषण, त्याचा गावाला होणारा त्रास, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम तसेच त्या मंदिराच्या आसपास असणारी झाडं आणि झाडावर असणारी पक्षांची घरटी, त्या पक्षांना होणारा त्या आवाजाचा त्रास, घरट्यामध्ये पिल्लं असतात त्या पिलांना त्रास, शिवाय पक्षांना पिल्लांना सोडून जाता येत नाही. इतका बारकाईने विचार लेखकाने केलेला आहे. आपल्या भक्तीचे प्रदर्शन होणार नाही तसेच कोणत्याही जीवाला त्याचा त्रास होऊ नये, याची दक्षता भक्तांनी घ्यायला हवी, असे लेखकाला वाटते.
वडाच्या झाडाकडे एक चिमणा आणि चिमणी दमून आलेले आहेत. त्यांना फार मोठे दुःख झालेले आहे. कारण त्यांचे घरटे एका झाडावर होते, त्यामध्ये त्यांची पिल्ले होती आणि ते झाड माणसांनी तोडलं. त्यात त्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. हे दुःख आई वडिलांना पचवणं फार अवघड असतं. ते फक्त रडत होते. घडलेली सांगत नव्हते. त्यावेळी वडाचे झाड म्हणते, "उरातलं दुःख कुणाला तरी सांगाव, त्याशिवाय मन हलकं होत नाही पोरी. नाहीतर आतल्या आत जीवाला खाशील. मनात साचलेलं दुःख सांगून मोकळी हो. मन रितं केलेलं कधीही चांगलं नाहीतर ते जगू देत नाही. बेचैन करतं..." प्रत्येक व्यक्तीला हे लागू होतं, त्यामुळे माणूस आत्महत्या गोष्टीपासून परावृत्त होतो, अशा प्रसंगी शब्दांचा आधार महत्वाचा आहे. ही मांडणी लेखकाने चपखलपणे केली आहे.
या कादंबरीत झोका नावाचा एक घटक आहे. सासरी नांदायला गेलेल्या मुली नागपंचमीला माहेरी येतात आणि माहेरला आल्यानंतर झोका त्यांच्यासाठी आवडीचा विषय असतो. तो झोका बांधण्यासाठी गरज असते मोठ्मोठ्या वृक्षांची! जी आजकाल नामशेष होत चालली आहेत आणि त्यातला आनंदही नामशेष होतोय. तो फक्त कागदावर किंवा आठवणीमध्येच शिल्लक राहतोय. अशीच एक शहरात राहणारी मुलगी नागपंचमीसाठी माहेरी आलेली आहे आणि तिच्या हातात प्लास्टिकचे झाड आहे. नंदा आजी ते कुतुहलाने पाहते. त्या झाडाला पाणी घालायची गरज नाही, कचऱ्याची झंझट नाही. त्याची फळेफुले मात्र अगदी टवटवीत दिसतात. याचा तिला आनंद होतो. परंतु वडाचे झाड मनात म्हणते की ही शहरातली माणसं मोठमोठे वृक्ष तोडून जंगलचे जंगल नाहीशी करतात आणि त्या ठिकाणी सिमेंटचे भकास जंगल उभं करतात आणि मग वापरतात हे नकली प्लास्टिकचे झाडं. त्या झाडांच्या फुलांना नसतो गंध, नात् याची सावली, ना त्याचा हळुवार स्पर्श आणि निसर्गाची जी अनुभूती असते, ती त्यातून मिळत नाही. असं हा माणूस का वागतो? हा प्रश्न त्या वडाला पडलेला असतो. ही मांडणी लेखकाने खूप कौशल्याने आणि हळुवारपणे केली आहे.
वडाचे झाड स्वतः बोलताना किंवा वडाच्या झाडाशी कुणीतरी संवाद करताना बरेचशे प्रसंग या कादंबरीत आले आहेत. त्यामध्ये एकदा आजी वडाच्या झाडाला बोलत असताना तिचे दुःख ती सर्व भान विसरून झाडाला सांगत होती. अशावेळी शाळेतील मुलं ते लांबून ऐकतात आणि तिची टिंगल टवाळी करतात. हे जेव्हा पठाण सर निरीक्षण करतात त्यावेळी ते मुलांना समजावून सांगतात की आपण तिचं म्हणणं काय आहे, हे ऐकलं पाहिजे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. म्हणजे मुलांच्या मध्ये संवेदनशीलता हे मूल्य नकळतपणे रुजवण्यासाठी ओघवत्या भाषेत या ठिकाणी चित्रित केले आहे. पठाण सर एक उपक्रम घेतात. मुलांच्या ज्या भावना दडपलेल्या असतात त्या भावना व्यक्त होण्यासाठी प्रत्येक मुलांनी आपल्या मनातला प्रश्न एका पेटीत टाकायचा, त्यावर नाव लिहायचं नाही. त्यामुळे तो प्रश्न कोणाचा आहे. याची भीती नसते आणि मनातले प्रश्न मग विद्यार्थी ते पेटीत टाकतात आणि पठाण सर ती पेटी झाडाखाली नेऊन उघडतात आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नाला जोडलेले असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मध्ये जो न्युनगंड असतो. तो कमी करणे आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत वस्तू निष्ठ प्रश्नाचे उत्तर पोहोचवणे असा उपक्रमही या निमित्ताने कादंबरीमध्ये दिलेला आहे. जो विद्यार्थ्यांच्या भावविश्वास आकारणी देतो.
विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणारे अनेक उपक्रम शाळेमध्ये घेतल्याचे लेखकाने नोंदवले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सरपंचांनी भाषण केले आणि त्या भाषणात इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच सरपंचाने स्वतःच गावामध्ये इंग्रजी शाळा सुरू केल्याचे सुद्धा सांगितले. इंग्रजी शाळेला जर विद्यार्थी हवे असतील तर मराठी शाळेच्या अडचणीत वाढ करुन हीच मुले तिकडे पळवण्याचा बेत होणारंच. त्यातच रस्ता रुंदीकरणाची नोटीस आली आणि शाळा आणि वडाचे झाड हे रस्त्याला लागून असल्यामुळे त्यांच्यावर हे गंडांतर आले. हा प्रश्न पठाण सरांसह शाळेतील सर्व शिक्षकांना सतावत होता.
शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा वाचवण्याचे ठरवले. परंतु शाळा आणि झाड वाचवायचे असेल तर मात्र समोरच्या बाजूला असलेल्या मंदिराचे प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंतीचा थोडासा भाग त्यामध्ये जाणार होता. मंदिराच्या प्रवेशद्वाराला धक्का लागणार नाही. याची काळजी सरपंच आणि सर्व गावकरी घेत होते. कारण ते त्यांनी स्वतः वर्गणी काढून बांधले होते. शिवाय सरपंचांना स्वतःची इंग्रजी शाळा चालवण्यासाठी मराठी शाळा बंद पाडणे, सोयीचे होते. मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आंदोलन सुरू केले, पालकांचे प्रबोधन केले. आंदोलनाच्या पेपरला, टिव्हीवर बातम्या आल्या. ही बातमी नंदाजीचा मुलगा अतुलपर्यंत पोचते. तो गावात येतो आणि ही सगळी गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि तो मग सांगतो की, मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे, ते मी स्वतः बांधून देईल. तो शाळेसाठी पण मदत करतो आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मिटतो. शाळा आणि झाड वाचते, अशा पद्धतीचा हा घटनाक्रम अतिशय सुसंगतपणे विविध प्रसंगांचे बारकावे टीपत कादंबरीत प्रतिबिंबीत झाला आहे. ही कादंबरी शाळा आणि निसर्गाचे महत्त्व प्रतिबिंबीत करते. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेली ही कादंबरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येकाने ती वाचावी, अशी रसाळ आणि ओघवत्या भाषेत लिहिली गेली आहे.
- नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव, परभणी 8698372717
📗 झाड (सचित्र किशोर कादंबरी)
लेखक : गणेश घुले
मुखपृष्ठ व आतील चित्रे : शशी शेट्ये
मूळ किंमत : ₹250/-
सवलतीत : ₹225/- (पोस्टेज फ्री)
पेपरबॅक गेटफोल्ड | पाने : 136 | आकर्षक बुकमार्कसह
पुस्तक खरेदीसाठी व्हॉट्सअप क्र. 7030232506 (Phone pay / Gpay or any online payment mode)


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .