रमेश मुनेश्वर लिखित ‘चला ऑक्सिजन पेरूया!’ बालनाटिकेचे आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारण..

शालेयवृत्त सेवा
0

 




☝️..येथे आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण ऐकू शकता..


नांदेड (शालेय वृत्तसेवा) : 

          किनवट पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दरसांगवी (चि.), केंद्र शनिवारपेठ येथील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी लिहिलेल्या ‘चला ऑक्सिजन पेरूया!’ या बालनाटिकेचे आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारण झाले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या बालनाटिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची बीजे रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

         परभणी जिल्ह्यातील सेलू पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर येथील सहावितील विद्यार्थिनींनी आकाशवाणी परभणी केंद्रावर १३ सप्टेंबर २०२६ रविवारी सकाळी ११.३५ मिनिटानी 'बालमंडळ ' या कार्यक्रमात या बालनाटिकेचे प्रसारण झाले. डिसेंबर २०२५ च्या ‘किशोर’ मासिकात प्रकाशित झालेल्या या बालनाटिकेला विद्यार्थिनींनी आपल्या सादरीकरणातून जिवंत केले. या सादरीकरणासाठी शाळेतील प्रांजली गाडेकर, प्रांजल काकडे, प्रगती गाडेकर, स्नेहल गाडेकर, तेजस्विनी काकडे, आरोही काकडे आणि मार्गदर्शक शिक्षक माधव गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

          ‘झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरण वाचवू’ हा संदेश देणारी ही बालनाटिका बालवयातच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता ती एक लोकचळवळ व्हावी, तसेच प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपनही करावे, अशी प्रेरणा या बालनाटिकेतून मिळते.

         बालसाहित्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या बालनाटिकेचे आकाशवाणीवरून प्रसारण झाल्याने लेखक रमेश मुनेश्वर यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेतली गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)