प्रेरणादायी व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे हे सातत्याने समाजातील तरुणांना व्यक्तिमत्त्व विकास, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा अन् उद्योगाविषयी मार्गदर्शन करून विकासाची प्रेरणा देतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास जीवनामध्ये यश येतेच, यावर त्यांची अढळ निष्ठा आहे. प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत पार करता येतात. दडपणाला दडपून पुढे गेल्याशिवाय आपली धडपड यशस्वी ठरत नाही, असे त्यांचे अनेक सकारात्मक संदेश युवकांच्या मनात बळ भरतात, कार्याला प्रेरणा देतात. प्रेरणादायी प्रबोधन करणार्‍या डॉ. हनुमंत भोपाळे यांची वाटचाल प्रेरणादायी अशीच आहे.


नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील दरेगाव या छोट्याशा गावी एका शेतकरी कुटुंबात हनुमंत भोपाळे यांचा जन्म 01 जुलै 1974 रोजी झाला. आई-वडिलांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे हनुमंत भोपाळे यांनी शैक्षणिक जीवनाला सुरुवात केली. आजच्यासारखी शैक्षणिक साधने, सोयी-सुविधा फारशा नसल्या तरी, त्यांनी अशाही परिस्थितीत आपली वाटचाल थांबवली नाही. आपला मुलगा मोठा व्हावा ही भावना ठेवून ‘मोळी विका पण शिक्षण शिका’ या संत गाडगेबाबांच्या तत्त्वाचा अवलंब करून त्यांचे वडील मारोतराव भोपाळे व आई रुक्मीणबाई भोपाळे यांनी हनुमंत भोपाळे यांचे शिक्षण पूर्ण केले. गरिबीची जाणीव व आई वडिलांचे स्वप्न लक्षात घेऊन अत्यंत काटकसरीने हनुमंत भोपाळे यांनी शिक्षण घेतले. लहानपणापासूनच निर्व्यसनाचे संस्कार झाल्यामुळे ते आजही निर्व्यसनी आहेत. इतरांनाही हात जोडून व्यसनापासून दूर रहा, असा संदेश आपल्या लेखन, व्याख्यानांमधून ते देतात. ग्रामीण भागातला अनेक विद्यार्थी शहरात आल्यानंतर ‘आपण कमी आहोत’ हा न्यूनगंड बाळगत असतात; परंतु तो  हनुमंत भोपाळे यांनी बाळगला नाही. आई-वडील अथक परिश्रम घेऊन आपल्याला शिकवतात. मग आपणही अथकपणे अभ्यास केला पाहिजे, अशी त्यांची धारणा राहत आली. या धारणेनुसार त्यांनी अभ्यास केला. ते एम. ए. ला विद्यापीठातून मेरिटमध्ये पास झाले. एवढेच नाही तर प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पातळीवरची नेट परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. महाविद्यालयीन जीवनापासून साहित्यलेखन करणार्‍या हनुमंत भोपाळे यांना विद्यार्थिदशेतच निबंध लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे बोलावून त्यांचा सत्कार केला. हा सत्कार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केला होता. सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर व ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते 1999मध्ये प्रदान करण्यात आला. हे त्यांचे यश तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. विद्यार्थिदशेपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देतात. आजही अथकपणे ते काम चालू आहे. 


आपल्या गावाशी असणारी नाळ त्यांनी तुटू दिली नाही. ‘धीर सोडू नको बळी राजा’, ‘शेतकर्‍यांसाठी, महिलांसाठी उद्योगांच्या संधी’ ह्या कार्यक्रमांचे त्यांच्या गावी त्यांनी आयोजन केले. शिवजयंती, शाहू महाराजांची पुण्यतिथी त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन साजरी केली. बौद्ध समाजाचे एकच घर आणि तेही शिकले नसल्यामुळे, दारिद्य्रामुळे भीम जयंती साजरी करण्यास समोर येत नव्हते. यामुळे जयंती होत नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावामध्ये अजूनही झाली नाही, ही खंत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हनुमंत भोपाळे यांच्या मनात होती. ती खंत बाळगतच बसले नाहीत तर त्यांनी भीमजयंतीसाठी पुढाकार घेऊन आपल्या गावात साहित्यिक महेश मोरे, पी. बी. वाघमारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घडवून आणला.  भीमजयंतीनिमित्त हा कार्यक्रम हनुमान मंदिराच्या समोर संपन्न झाला. गावकर्‍यांचेही सहकार्य मिळविले. एका कुणब्याच्या पोराने भीमजयंती साजरी केली, याचे परिसरात कौतुकही झाले. प्राध्यापक म्हणून काम करत असताना ते अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून विशेष प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना पुस्तके देतात. इतर पुस्तकांबरोबरच त्यांनी प्रकाशित केलेली बहुतांश पुस्तके इतरांना वाटतात. कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो, ते पुस्तकाची भेट देतात व इतरांनाही  तसा उपदेश करतात. अध्यापन करत असतानाच त्यांनी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदाची दोन वेळेस धुरा यशस्वीपणे सांभाळली. 


वर्तमानकालीन तरुणांमधील न्यूनगंड, उदासीनता, नैराश्य, मानसिक गोंधळ दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न व्याख्यान व लेखनातूनही चालू आहे. आई-वडिलांचे महत्त्व अपार असल्याची जाणीव ते आपल्या वागण्या-बोलण्यातून करून देतात. त्यांनी स्वत: आपल्या जीवनात  हे तत्त्व पाळले आहे. आईला कॅन्सर झालेला होता, तर वडिलांच्या किडण्या खराब झालेल्या होत्या. त्यांच्या उपचारासाठी लागणारा पैसा तेव्हा पगार नसल्यामुळे त्यांच्याकडे नव्हता, तरी त्यांनी कर्ज काढून, पत्नीचे दागिने विकून हा खर्च केला. त्यामुळे आर्थिक ताणतणावाला सामोरे जावे लागले; तरीही ते मागे हटले नाहीत. आई-वडिलांमुळेच आपल्याला आयुष्य मिळाले याची जाणीव त्यांच्या मनात सतत असते. गुणवंतांचा सत्कार करणे, हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांच्या सहवासात गेलेल्या व्यक्तींनी यश मिळवलेलं आहे, हे कळलं की, ते त्याचा सत्कार करतात. यशाचे कौतुक करतात. अपयशी झालेल्यांना धीर देऊन पुन्हा यशासाठी प्रेरित करतात. सध्या समाजामध्ये कोणाचे कौतुक करण्यासदेखील शब्ददारिद्य्र दिसते. डॉ. हनुमंत भोपाळे यांच्याकडे शब्दांची श्रीमंती आहे. ही श्रीमंती ते सतत वाटताना दिसतात.  आवडलेल्या ग्रंथ, लेखाबद्दल फोन करून त्याचे कौतुक करतात. अनेक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे. शब्दांची उधळण ते सातत्याने करत असतात, म्हणून त्यांना ‘चालतं बोलतं प्रेरणेचं विद्यापीठ’ म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. सतत ते कार्यमग्न दिसतात. गोवा विद्यापीठामध्ये उजळणी वर्गाला गेले असता त्यांनी एका महिन्याच्या कालावधीत त्या ठिकाणी ‘ध्येयवेध’ ग्रंथाचेे लेखन करून गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले. हेे पुस्तक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.  प्रश्न सोडवण्याचे कौशल्य, वाटच ‘वाट’ दाखवते. इत्यादी लेख तनामनाला प्रेरणेचे बळ देतात. ‘प्रेरणा’, ‘पुन्हा प्रेरणा’, ‘साधना’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रेरणादायी असे आहेत. ‘यशाचा राजमार्ग’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रिय ठरले आहे. त्याचे कन्नड भाषेमध्ये भाषांतर होऊन तो ग्रंथ आता प्रकाशनासाठी सिद्ध झाला आहे.  


2008 साली नांदेड येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय गुरु-ता-गद्दी या कार्यक्रमात हनुमंत भोपाळे यांच्या ‘शीख गुरुचरित्र आणि कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. शीख धर्माचा त्यांनी केलेला अभ्यास उपकारक असून शीख धर्मीय हे राष्ट्रप्रेमी असून त्यांच्याकडून राष्ट्रप्रेम, सेवेचा आदर्श घेतला पाहिजे, असे त्यांना वाटते. ‘समृद्धीच्या वाटा’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या साहित्यावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांबरोबरच अनेक ठिकाणच्या स्थळ आणि व्यक्ती यांना भेटी देऊन अभ्यास केला. त्यांच्या वागण्या-बोलण्यात स्पष्टपणा दिसून येतो. काळ्या मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलासोबत ते अधिक समरस होतात. खेडेगावात प्रबोधन करण्यास त्यांना अधिक आवडते. याचा प्रत्यय मला गेल्या वर्षी मी मुख्याध्यापक या नात्याने गणपूरच्या गावकर्‍यांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते तेव्हा आला. ना धनाची, ना मानाची अपेक्षा न ठेवता मिळेल त्या वाहनाने येऊन त्यांनी मार्गदर्शन केले. चहासुद्धा न घेता ते परत गेले. ‘जे जे आपणांसी ठावें, ते ते इतरांशी सांगावें’ या उक्तीप्रमाणे आंतरिक तळमळीतून ते मार्गदर्शन करतात. 

उन्हाळ्याच्या सुट्ट्यात  डॉ. हनुमंत भोपाळे मात्र ग्रामीण भागात प्रबोधन करण्यासाठी फिरतात. साधी राहणी, उच्च विचारसरणी बाळगणार्‍या, सरळ आणि प्रेमळ स्वभावाचा, वर्तमानकालीन तरुणांना दिशा देणारा हा अवलिया निश्चितच कौतुकास पात्र आहे. कृतज्ञता हा त्यांच्या अंगी असणारा गुण दिसून आला. लेखक, वक्ते, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हनुमंत भोपाळे यांनी अभिनव भारताचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्या या धडपडीला जे जे सहकार्य करतात त्या सर्वांविषयी व गुरुजनांविषयी त्यांच्या मनामध्ये नितांत आदर आहे. आजही प्राथमिक शाळेत शिकवलेल्या शिक्षकांपासून ते उच्च शिक्षण दिलेल्या सर्वच गुरुजींविषयी आदरानेच बोलतात. आजही त्यांच्यासोबत ते नाळ जोडून आहेत.


पंडित पवळे, नांदेड

(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)