रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०६० नंदुरबारतर्फे तुकाराम अलट यांना शिक्षक उत्कृष्ट त्या पुरस्कार २०२५ प्रदान

शालेयवृत्त सेवा
0




नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) : 
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०६० अंतर्गत टीम अचिव्हर्स – यूनाईट फॉर गुड तर्फे आयोजित "शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार २०२५” हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात नंदुरबार नगरपालिका भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आर.टी.एन. आशिषजी पटवारी ( डीजीई–२०२७–२८) तर सन्माननीय पाहुणे म्हणून श्री. आर.टी.एन. रितेश जैन (एजी–२०२४) उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन आर.टी.एन. फादर टेनी (राष्ट्रपती), आर.टी.एन. सुनील सोनार (सचिव), आर.टी.एन. देवेंद्र उपासनी (प्रकल्प अध्यक्ष) तसेच आर.टी.एन. करनसिंग गिरासे (प्रकल्प सह-अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. समारंभात उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक तुकाराम अलट यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील सेवाभाव, निष्ठा आणि गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल शिक्षक तुकाराम अलट यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०६० नंदुरबार तर्फे या सन्मान सोहळ्याचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काथर्दे खुर्द (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आदर्श शिक्षक श्री. तुकाराम गुंडेराव अलट यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व नेतृत्वात्मक कार्याबद्दल रोटरी क्लब नंदुरबार यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्याला रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. श्री. तुकाराम अलट यांनी ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि प्रकल्पाधारित शिक्षण यांची समाजात दखल घेत "Teachers Excellence Award 2025" प्रदान करण्यात आला.


श्री. तुकाराम अलट यांनी "हसत-खेळत शिकूया", "गणित प्रयोगशाळा", "वाचन कोपरा", "कविता गाऊया" यांसारख्या सर्जनशील उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली. त्यांनी प्रकल्प व अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तव जीवनाशी निगडित ज्ञान दिले. सामाजिक क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’, ‘हर घर तिरंगा’, ‘वृक्षारोपण’, तसेच ‘एक पेड मातृभूमीच्या नावाने’ अशा उपक्रमांतून समाजाशी शाळेची एकात्मता दृढ केली.


त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा, क्रीडाक्षेत्रातील कामगिरी व सांस्कृतिक स्तरात उल्लेखनीय वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे प्रेरणादायी ठरत असून, शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहादा तालुका गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे,महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०६० शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार या सन्मानामुळे श्री. तुकाराम अलट यांचे कार्य अधिक गतीमान होईल, तसेच इतर शिक्षकांसाठी ते प्रेरणास्थान ठरतील, अशी भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)