शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीवर संक्रांत..

शालेयवृत्त सेवा
0

 




२५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण !


नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या पत्रानुसार राज्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या सुट्टीतील कालावधीमध्ये सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीवर संक्रांत आली आहे.


मागील वर्षापासून इयत्ता १ १ ते १२ वी करिता अनेक शिक्षण सेवक हे पवित्र पोर्टलमार्फत राज्याच्या विविध भागांमध्ये नियुक्त झाले आहेत. विदर्भातील बहुतांश शिक्षण सेवक हे कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागात नियुक्त झाले आहेत. तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण सेवक हे विदर्भात सेवा देत आहेत. आपल्या मूळ गावापासून आणि घरापासून शेकडो किलोमीटर अंतरावर अत्यल्प म्हणजे १६ हजार रुपये मासिक मानधनावर हे शिक्षक कार्यरत आहेत. त्यात त्यांना रजाही कमी आहेत. आता दिवाळीच्या कालावधीत हक्काच्या बारा दिवसांच्या सुट्ट्या मिळत असताना त्यातही ७दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केल्याने हे शिक्षण सेवक संतप्त झाले आहेत.


मागील वर्षी २०२४ मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टीत अशाच प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यांनाही परत यावर्षी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही जिल्ह्यांच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी २०१९ ते २०२५ दरम्यान रुजू झालेल्या नवनियुक्त शिक्षकांकरिता २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्टयांमध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी ७ दिवसांचे प्रशिक्षणाचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे.



ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना वगळण्यात यावे..

मागील वर्षाच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आणि यावर्षीच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमदेखील अगदी सारखाच आहे. एकच प्रशिक्षण दरवर्षी घेण्याचा काय फायदा असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर मागील वर्षी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांना जर परत तेच प्रशिक्षण यावर्षीदेखील दिले जात असेल तर यामध्ये शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचीदेखील विनाकारण उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे यापूर्वी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना या वर्षीच्या प्रशिक्षणामधून वगळण्यात यावे.


प्रा. सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह शिक्षक भारती नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)