ओंजळीत सांभाळलेले परागकण: पारिजात परिक्रमा
वाचत वाचत वेचलेले विचार विचारपूर्वक साठवून स्वतःचे अंतकरण शुद्ध ज्याला करता येते तो उन्नत होऊन अद्वितीय ठरतो आणि त्याचे जगणे- वागणे पारदर्शी ठरते व स्थितप्रज्ञता त्याच्या ठिकाणी आविष्कृत होते हे मात्र नक्की !
अनसूया सुभाषराव मोरे या त्यापैकीच एक! त्यांनी पारिजात परिक्रमाच्या माध्यमातून आयुष्यभराचे साठवून ठेवलेले संचित आपल्यासाठी तथा मराठी वाड्.मयासाठी खुले केले आहे .पुस्तकाचे कोणतेही पान उघडले की त्यातून नवीन ,उत्साहवर्धक आब जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य सापडतं!
याचना केल्याने अपमान होतो हे बिद्र पहिल्याच पानावर मोरेताई ,सांगून विचारांचे तरंग उठवतात हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे..
संतसाहित्य, समाज, संसार, संस्कार, शिक्षण, गाव -शिव, गाथा ,पोथी, पुराण यातून त्यांनी वेचलेले माणिकमोती या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर खुले केले आहे .प्रार्थनेविषयीची नवीन माहिती तथा प्रार्थनेचा अर्थ शोधून काढताना त्या म्हणतात," जर देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत असेल तर तो तुमच्यात विश्वास वाढवत असतो ,जर त्याच्याकडून उशीर होत असेल तर तो तुमच्या संयमात वाढ करत असतो आणि जर तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाही, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याला माहिती असते की तुम्ही परिस्थिती चांगली हाताळू शकता!
स्वतः जवळची सगळी इच्छाशक्ती वापरून मनाशी पक्के होत भोगलेले जगणे
जगजाहीर करणे यात फार मोठी नैतिक ताकत असते. ती अनसूया मोरेताई जवळ सदोदित आहे म्हणून तर त्या ओंजळीच भाष्य सहज करतात-
" ओंजळ कधीच रिती होत नाही. ती
पुन्हा- पुन्हा भरत जाते. ओंजळ सांगते आधी द्या, मग घ्या " गाय ,पाठीवर बसणाऱ्यांना कधी दूध देईल का? ज्यांना दूध हवे असेल त्याने गाईच्या पायाशी बसायला शिकले पाहिजे .असंल अस्सल तत्वज्ञान धुंडून काढून आपल्या समोर त्यांनी मांडलं आहे.
अनेकांना जे ऐकण्यास आवडत नाही ते सांगण्याचा अधिकार असणं हेच खरं स्वातंत्र्य !हे जपलेलं स्वतंत्र मुक्तपणे चौकाचौकात छातीठोकपणे सांगता आलं पाहिजे आणि जिंकणं काय असतं हे पहिल्यांदा हरणाऱ्याकडून शिकता आलं पाहिजे ही खरी सज्जनपणा ची कसोटी म्हणजे देवपुजाच असते! स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असाच घेतात आणि गोंधळ होतो संयम व संस्कार परागंदा होतात ,मग जीवनात वैफल्य तर येतेच आणि मग बुद्धी वेदनेची तक्रार करते हे संपवायचं असेल तर जीवनाच्या पथमार्गात फुले अंथरताना काटे टोचणार नाहीत याची दखल घ्यावी लागते हे तत्त्वज्ञान अनसूया मोरे यांचे पुस्तक सांगून जाते.
पारिजात परिक्रमा हे संकलन केलेले विचारांचे पुस्तक हे भावनांची पडझड कशी होते? नैराश्याचे क्षण काय सुचवितात? मनोरथ का कोलमडतात? स्वप्न बेचिराख होतात का? रडणं नैसर्गिक आहे, मग रडत बसणं म्हणजे निष्क्रिय होणं आहे का? यासह अनंत प्रश्नांची उत्तरे देणारे आहे .
अनसूया सुभाषराव मोरे या दुःखातून मार्ग काढणाऱ्या व सुखाच्या शोधात निघालेल्या लेखिका मुळीच नाहीत ,तर दुःखाला हाती धरून खडतर मार्ग चालणाऱ्या त्या प्रकाशदूतच आहेत कारण त्या म्हणतात " बरं झालं हा कॅन्सर झाला, माणसाची किंमत, काळजी मला कळली"
मी आनंदी आहे, जीवनाचे सारे अध्यात्म जगणारी व्यक्ती आपल्या पुढ्यात उभी राहून हे सांगण्याचे धाडस करते ते धनुष्य पेलवत त्यांनी लेखणी सांभाळली आहे.
दुःखाचा समर्थन करताना त्याने रवींद्रनाथांची गोष्ट सांगितली आहे, परमेश्वर आणि माणूस यांच्यातल्या संवादाची...
परमेश्वर म्हणतो ,"मी सतत तुझ्या बरोबरच असतो ,त्यावर माणूस म्हणतो "साफ चूक" आजवरच्या प्रवासात मी जेव्हा जेव्हा मागे वळून पाहिलं तेंव्हा तेंव्हा फक्त आनंदाच्या क्षणी माझ्याबरोबर तुझी पावले दिसली आणि दुःखात तर मी एकटाच होतो तू कुठे होतास? त्यावर देव म्हणतो," त्यावेळी मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं होतं"
असे जीवनाचे गीत सुरेल करण्यासाठी पुस्तकाच्या ठायी ठायी मंत्र सापडतात. आपल्यात ऊर्जा पेरून, आत्मसुखात आत्ममग्न राहण्यासाठी साधेपणा आणि शुद्धता हे दोन पंख आपल्याजवळ पाहिजेत हे सिद्ध करणारं हे पुस्तक..
प्रसिद्ध कवी सफदर हाश्मी, चर्चिल , जनाई, मुक्ताई ,बहिणाई, ज्ञानाई ,ओशो यांच्या विचारांबरोबरच पोवाडे ,कविता, वचन, ओव्या ,अभंग ,श्लोक, सुभाषित यांचा वापर करत माणुसकीचा जयजयकार करून मर्यादित संतती, पुरेशी संपत्ती ,व्यसनापासून अलिप्ती,सुदृढ शरीर आणि ईश्वरभक्ती या पाच गोष्टी म्हणजे सुखी जीवनाचे पंचशील होय.हे सांगत शब्द हा देव समजून जीवनाची आशादायी बाजू मांडताना आयुष्याची गुंतागुंत सोडवण्यात व वास्तववाद स्वीकारण्यात मोरेताई नक्कीच यशस्वी झाल्या आहेत ,काही वादळ शहाणी असतात. मोठे घर पाडतात,अन् चिमणीचं घरटं जपतात हा चिरंतन विचार सांगताना "तुम्हाला शत्रू हवे असतील तर तुम्ही गुणवत्तेने त्याच्या पेक्षा वरचढ ठरा,मित्र हवे असतील तर दुसर्याना तुमच्यापेक्षा वरचढ ठरू द्या " हे कोल्टनचे विधान सांगायला त्या विसरल्या नाहीत..
मराठी साहित्यातील अनमोल विचारधनाचा ठेवा असलेलं आगळंवेगळं पारिजात परिक्रमा असून त्यातून समाजाच्या सर्व स्तरांचा साकल्याने विचार केलेला दिसतो. सदर पुस्तकांचे अप्रतिम मुखपृष्ठ श्रीधर करंडे यांनी समर्पक साकारले आहे .महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांनी प्रस्तावना लिहून उंची प्राप्त करून दिली आहे तर गणगोत प्रकाशनचे पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड यांनी या पुस्तकाची अप्रतिम बांधणी केल्यामुळे हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे !
अनसूया सुभाषराव मोरेताई यांच्या ईच्छाशक्तीला लाख सलाम!!
पारिजात परिक्रमा ( संकलन)
अनसूया सुभाषराव मोरे
मुखपृष्ठ :श्रीधर करंडे
प्रकाशक: गणगोत प्रकाशन, देगलूर
पृष्ठे 167 किंमत 250
------------------
पुस्तक परिचय :
वीरभद्र मिरेवाड
नायगाव (बा)
9158681302
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .