महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेस आश्वासन.
मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (आर.टी.ई.) मधील शिक्षक निश्चती निकषांमध्ये आवश्यक बदल करून सर्वच उच्च प्राथमिक शाळांना विना अट मुख्याध्यापक व इयत्ता 1 ते 5 च्या वर्गांना किमान 3 शिक्षक मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन खासदार संजयसिंह मंडलिक यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास नुकतेच दिले.
संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा.मंडलिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आर.टी.ई.अँक्टच्या सध्याच्या निकषांनुसार फक्त 25 ते 30 टक्के शाळांमध्येच पात्र मुख्याध्यापक पद मंजूर होते. म्हणजे 70 ते 75% शाळा या मुख्याध्यापक विना सुरू आहेत. तेथील सिनिअर शिक्षकांना वर्ग साभांळत शालेय प्रशासन सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शालेय प्रशासकीय कामकाजासाठी सर्वच उच्च प्राथमिक ( इ .1 ते 7/8 वी ) शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे व 121 पेक्षा जास्त पट असलेल्या प्राथमिक ( इ .1 ते 5 वी ) शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर होणे आवश्यक असल्याची बाब खा.मंडलिक यांच्या लक्षात आणून दिली.
तसेच शिक्षक निश्चिती निकषांमध्ये इयत्ता 1 ते 5 च्या वर्गांना 60 पर्यंत विद्यार्थी संख्या असलेस 2 च शिक्षक व त्यापुढील प्रत्येक 30 विद्यार्थ्यास 1 शिक्षक अनुज्ञेय आहे.
आपल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश प्राथमिक शाळा डोंगराळ भागातील कमी लोकवस्तीच्या गावात आहेत. अतिदुर्गम भागात म्हणजे वाडीवस्तीवरील इयत्ता 1 ते 5 वर्गाचा पट 60 च्या वर जात नसल्याने तेथे इयत्ता 5 वीचा वर्ग असूनही तिसरा शिक्षक मंजूर होत नाही. अशा शाळांमध्ये वर्ग 5 आणि शिक्षक मात्र 2 अशी अवस्था झाली आहे . एका शिक्षकास तीन तीन वर्गाचे अध्यापन करावे लागणे जे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही .
तेंव्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होवू नये म्हणून 60 पेक्षा कमी पट असणाऱ्या इ . 1 ते 5 च्या वर्गाना किमान 3 अध्यापक पदे मंजूर असणे आवश्यक असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी सांगितले.
निवेदनात, आर टी ई अँक्ट नुसार इयत्ता 1 ते 4 वर्गाच्या सर्वच प्राथमिक शाळानां इयत्ता 5 वी चा वर्ग विनाअट जोडावा व 7 वी चा वर्ग असलेल्या शाळांना 8 वी चा वर्ग विनाअट जोडण्याचे निर्देशही संबधीतांना लवकर व्हावेत आणि शिक्षक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असणे हे आर टी ई अँक्ट चे उल्लंघन करणारी बाब असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी लवकरात लवकर 100% रिक्त पदे भरावीत इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचे सह राज्य संघटक पी आर पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा सरचिटणीस शंकर पवार, जिल्हा प्रमुख सल्लागार आर एस पाटील, नामदेव पाटील, संजय चव्हाण, बाळनाथ डवरी, नंदकुमार जाधव,रंगराव वाडकर, पांडूरंग घुगरे, प्रशांत गायकवाड आदी पदाधिकारी सहभागी होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .