कात्रीसारखे कापणारे होऊ नका तर सुईदो-यासारखे जोडणारे व्हा! प्रा. माधवी घारपुरे

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई  ( उदय नरे ) :

' परिसस्पर्श स्व- विकासाचा ' उपक्रमांतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी- शिक्षक ऑनलाईन कौतुक सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ' श्वास ' चित्रपटाच्या लेखिका प्रा. माधवी घारपुरे ' शिक्षकहो, टीपकागद होऊया !' या विषयी बोलत असताना " ज्याप्रमाणे कात्री कापण्याचे म्हणजे तोडण्याचे काम करते आणि सुईदोरा जोडण्याचे काम करतो त्याप्रमाणे जी माणसे समाजात जोडण्याचे काम करतात त्यांना डोक्यावर घेतले जाते आणि जी माणसे समाजात तोडण्याचे काम करतात त्यांना पायदळी घेतले जाते "असे सांगून माणसाने अहंपणा, मीपणा, काम, क्रोध, मोह आदी दुर्गुणांचा त्याग करून टीप कागदाप्रमाणे सद्गुण टीपले पाहिजेत असे सांगून विद्यार्थी- शिक्षकांना संबोधित केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि साहित्यिक प्राचार्य अशोक चिटणीस उपस्थित होते. 

        ' परिसस्पर्श स्व- विकासाचा 'उपक्रमांतर्गत शंभर यूट्यूब व्हिडिओ सादर करणाऱ्या महाराष्ट्रभरच्या मान्यवरांच्या तसेच  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने घेतलेल्या ' देशप्रेम ' या चित्रकला व चारोळी काव्यरचना लेखन स्पर्धेत सहभागी  व यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना इ- प्रमाणपत्रांनी सन्मानित करून या सर्वांचे कौतुक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपक्रमाच्या प्रमुख संगीता पाटील यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाचा हेतू सांगितला. पूनम राणे यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. नागपूरहून डॉ. सोनाली हिंगे यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी असे सूत्रसंचालन केले. 


       चित्रकला स्पर्धेचे परीक्षण अर्जुन माचिवले यांनी तर चित्रचारोळी लेखन स्पर्धेचे परीक्षण विठ्ठल कुसाळे यांनी केले.डाॅ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास सांगून या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून कोरोनासारख्या कठीण काळातही अशा उपक्रमांची विद्यार्थी, शिक्षक - नागरिकांसाठीची गरज सांगून पुढील उपक्रमांसाठी प्रमुख पाहुणे प्राचार्य अशोक चिटणीस यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रत्नागिरीहून कु. हर्षाली केळकर या विद्यार्थिनीने ' जय शारदे वागेश्वरी ' हे ईशस्तवन नृत्य सादर केले.दिगंबर वारे आणि स्वाती वैद्य यांनी स्पर्धकांमधून प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आभार अनघा जाधव यांनी मानून शेवटी तेजश्री कुलकर्णी यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)