सर फाऊंडेशनचा विजय दिगंबर माने आणि आयुब कलाम शेख या उपक्रमशील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान..

शालेयवृत्त सेवा
0



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी लोणावळा (सिंहगड इन्सिट्यूट ) या ठिकाणी पार पडलेल्या नॅशनल एज्युकेशनल इनोव्हेशन काॅन्फरन्स २०२१ मध्ये सर फाऊंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील विजय दिगंबर माने आणि आयुब कलाम शेख या दोन शिक्षकांना राज्याचे साखर आयुक्त मा.श्री.शेखर गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


विजय माने यांच्या 'अभ्यासातील खेळाचे महत्त्व' या नवोपक्रमाची निवड झाली तर आयुब शेख यांच्या 'भाषा विकासातील डोळस शैक्षणिक प्रयोग' आणि 'उपयुक्त मधली सुट्टी' या दोन नवोपक्रमांची निवड करण्यात आली आहे.


देशातील विविध राज्यातून शिक्षक या  कॉन्फरन्ससाठी हजर होते. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. डॉ. ह. ना.जगताप (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सोलापूर ), डॉ. शकुंतला काळे (माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे), श्री.विकास गरड (उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे), श्री. प्रशांत कोठाडिया (शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते, पुणे), डॉ. सौ. सुचिता पाटेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, अकोला), श्री. चेतन पटेल (राष्ट्रीय समन्वयक, शोधयात्रा सृष्टी व हनी बी नेटवर्क, अहमदाबाद), श्री. सुभाष कत्ते (माजी वैज्ञानिक अधिकारी, एनसीएल, पुणे ), श्री. सानिद पाटील ( सीनिअर मॅनेजर, इन्व्हेस्ट इंडिया, नवी दिल्ली), सौ. मिरा डेंगळे पाटील (अध्यक्षा, साई चॅरिटेबल ट्रस्ट, वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर), राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड (IAS), अतिरिक्त पोलीस महासंचालक (सेवा व सुविधा ) श्री. अतुलचंद्र कुलकर्णी,, आयकर उपायुक्त श्री. स्वप्निल पाटील, वाबळे वाडी चे दत्ता वारे सर, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 'नॅशनल टीचर्स इनोव्हेशन अवार्ड २०२१' पुरस्कार वितरीत करण्यात आले. देशभरातील प्रयोगशील शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


दोन दिवस वैविध्यपूर्ण शैक्षणिक देवाणघेवाण, चर्चासत्र, व्याख्याने या काॅन्फरन्समध्ये आयोजित करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेतील या दोन शिक्षकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)