पदोन्नती करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीकडून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन

शालेयवृत्त सेवा
1 minute read
0

 


बदल्यांआधी पदोन्नती न झाल्यास २५० शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता !





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेआधी शिक्षकांतून करावयाच्या मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती केली नाही तर, जिल्ह्यात जवळपास २५० शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची त्वरीत सोडवणूक व्हावी, यासाठी शिक्षक संघटना समन्वय समिती, जिल्हा नांदेड यांच्याकडून २९ मे रोजी जि.प. समोर धरणे आंदोलन करण्यात आले.


पात्र शिक्षकांतून विषय शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती करावी, पात्र र शिक्षकांस निवडश्रेणी, चटोपाध्याय वेतनश्रेणी, पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, ३ टक्केमधून नियुक्त शिक्षक वगळून संवर्ग-१ मधील शिक्षकांची प्रमाणपत्रासह शारिरीक पुनर्तपासणी करावी, पदाचा पदभार, कार्यभार शासन निर्णयानुसारच द्यावा, वेतन देयक तयार करण्याचे सर्व डीडीओ-१ यांना प्रशिक्षणद्यावे, निवृत्तीवेतन विनाविलंब द्यावे, तालुकास्तरीय सुलभकांचे मानधन द्यावे, वैद्यकीय व इतर थकबाकीच्या देयकाची रक्कम अदा करावी, माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवावे. माहूर व किनवट तालुक्यास पूर्णतः दुर्गम व आदिवासी भाग म्हणून घोषित करावे, अशा विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले.


सदर धरणे आंदोलनात, अखिल शिक्षक संघटना, शिक्षक संघ (थो.), 'आस' शिक्षक संघटना, पुरोगामीशिक्षक संघटना, शिक्षक समिती, बहुजन शिक्षक महासंघ, शिक्षक काँग्रेस, इब्टा शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, टाईड्स शिक्षक संघटना, शिक्षक संघ (शि.), शिक्षक भारती, पंजाबराव देशमुख, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ आदी शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला होता.



खासदार रविंद्र चव्हाण यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट


शिक्षकांच्या धरणे आंदोलनास काँग्रेस खा. रविंद्र चव्हाण भेट देवून त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावेली व शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे यांच्याशी भ्रमध्वनीवर संपर्क साधून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सुचना केल्या. सीईओ मेघना कावेली यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळास सोमवारी भेटीसाठी निमंत्रित केले असून पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)