नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर स्वराज्य निर्माण करताना अनेक अडचणी, अडथळे, समस्या आणि प्रश्न होते. या प्रश्नांना त्यांनी अतिशय कल्पकतेने उत्तर देणारी यंत्रणा उभी केल्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण होऊ शकले. आपण आपल्या जीवनातील प्रश्न, समस्या, अडचणी आपोआप सुटतील म्हणून वाट न बघता त्या प्रश्नांना उत्तर देणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. वाटच पाहात बसल्याने प्रश्न सुटत नाही, नैराश्य आणि अपयश येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते साहित्यिक प्रो. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले. ते श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन, नांदेडने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेचा हिमालय ह्या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सरिता पाटील ह्या होत्या. डॉ. हनुमंत भोपाळे पुढे बोलताना म्हणाले, ’शिवछत्रपतींच्या चरित्राच्या वाचन, चिंतन आणि मननाने आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण होऊन उदास होऊन बसलेला माणूसही कार्यशील आणि प्रगतीशील बनतो, एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्या ते जागचीच हालत नाहीत, अशा निरास, उदास होऊन बसलेल्यांना शिवछत्रपतींचे चरित्र वाचायला द्या. चरित्र ऐकवा, तो पुन्हा यशासाठी सिद्ध होईल. उदात्त ध्येयनिष्ठा, तनमनधन साधना, कल्पक नियोजन, आत्मसंयम, दृढइच्छाशक्ती, आत्मविश्वास, समर्पण, निर्भयता, दूरदृष्टी गुणग्राहकता आणि संघटनशक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य आणि क्रूरशक्ती परकियशक्तींला बाजूला सारून स्वराज्य निर्माण करून दाखवले. ह्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन जगणार्या माणसांच्या कार्याला यश येते. जगातील अनेक यशस्वी लढ्याची प्रेरणा शिवाजी महाराजांचे चरित्र आहे. कधी थोडा वेळ अपयश आले तरी खच्चून न जाता अपयशाचे रूपांतर यशात करण्याची शक्ती देणार्या शिवाजी महाराजांचे चरित्राचे पारायण घराघरांत, गावागावात झाली पाहिजे, असे प्रो. हनुमंत भोपाळे यांनी सांगितले.
या प्रसंगी छात्र-अध्यापक आदर्श टाक, पूजा कदम, गणेश फुलारी, चंदना कल्याणकर व स्नेहल जाधव यांनी भाषणं, पोवाडा व देशभक्तीपर गीतं सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कदम यांनी केले, तर आभार देवेंद्र सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेशकुमार नलगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जोशी एम. आर., डॉ. संजीवनी चव्हाण, ग्रंथपाल राम कदम, कार्यालयीन कर्मचारी स्वप्निल दरणे, शरद घोगरे आणि सर्व छात्र-अध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .