मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील १,१०,६३१ अंगणवाडीमधील ३० लाख बालकांसाठी यंदापासून 'आधारशीला बालवाटिका' अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. महिला बालविकास विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्याची प्रशिक्षित अंगणवाडीसेविकांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्याचे आणि इयत्ता पहिलीलादेखील नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
अंगणवाडीमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून 'आधारशीला बालवाटिका'ची अंमलबजावणी होणार असून, त्यात जादुई पिटारा आदी बालकांसाठी पूरक शैक्षणिक साहित्याचा वापर होणार आहे.
अंगणवाडीची मुले शाळेत !
त्यातून बालकांना कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अतिरिक्त व रिकाम्या वर्गखोल्यासुद्धा अंगणवाडीसाठी वापरल्या जातील. याबाबत आयसीडीएस आणि शिक्षण विभाग यांनी समन्वयाने हे स्थानांतरण करणे अपेक्षित आहे.
या अभ्यासक्रमासाठी अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम एससीईआरटीकडून करण्यात येईल. प्रत्येक अंगणवाडीचे जिओ टॅगिंग करून मूलभूत सुविधांबाबत माहिती पडताळणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .