डॉ. हेमंत कार्ले यांच्या इंग्रजी पुस्तकांचे थाटात प्रकाशन; माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे आणि उपशिक्षणाधिकारी बनसोडे यांची उपस्थिती

शालेयवृत्त सेवा
0

 



पाठांतर टाळून विद्यार्थ्यांनी आकलनावर भर द्यावा- प्रा.डॉ. दिलीप चव्हाण


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असून ती ज्ञानसंवादाचीही भाषा आहे. आपण जेंव्हा आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो तेवढाच इतर भाषांचाही सन्मान केला पाहिजे. यासाठी विविध प्रकारचे विद्यार्थ्यांचे छंद जोपासणार्‍या आणि नेतृत्व गुणांना वाव देणार्‍या शाळांची आवश्यकता आहे. भाषिक खेळ आणि छंद यातून भाषेची समृद्धी होते. अशा शाळांनी पाठांतर टाळून आकलनावर भर देणारे उपक्रम राबवायला हवेत असे मत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण संकुलाचे संचालक प्रा.डॉ. दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. 


ते बारड येथील डॉ. हेमंत कार्ले लिखित ’लिट्ल ओरेटर्स आणि ’लेट्स लर्न इंग्लिश अँकरिंग’ या इंग्रजी भाषेतील दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे, जि.प. चे उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, बारडच्या सरपंच मंगलाताई बुरडे, मुदखेडचे माजी गटशिक्षणाधिकारी डी.डी. सुपे, प्राचार्य हेमंत इंगळे, प्रसिद्ध वक्ते बालाजी थोटवे, डॉ. विलास ढवळे, सेवानिवृत्त इंजिनिअर रामराव देलमाडे, संजयकुमार पावडे, कैलास पुलकंडवार, गोडसे मामा बारडकर आदींची उपस्थिती होती.


राज्य पुरस्कार प्राप्त डॉ. हेमंत कार्ले यांच्या दोन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन जि.प. हायस्कूल बारड येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांच्या यथोचित सत्कारानंतर शाळेतील मुलींनी राज्यगीत आणि स्वागत गीत गायले. प्रास्ताविकानंतर डॉ. कार्ले यांच्या लिटल ओरेटर्स आणि लेट्स लर्न इंग्लिश अँकरिंग या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यानिमित्ताने उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे आणि माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे यांनी मनोगते व्यक्त केली.


डॉ. दिलीप चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की अभ्यास करणे म्हणजे पाठांतर नव्हे. ते पूर्णपणे टाळून आकलनावर भर द्यावा आणि शिक्षण व्यवस्थेतील अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे. बारडच्या विद्यालयात डॉक्टरेट धारण केलेले आणि पुस्तक लिहिणारे शिक्षक असणे ही महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक लेखक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बालाजी थोटवे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका शुभांगी तळणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुराव कुलूपवाड, विठ्ठल पवार, तानाजी ताटे, सुनील चमकुरे, सुहास अंबड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जि.प.हा. बारडच्या विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)