व्यंकटेश चौधरी यांच्या 'अनाहत' काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

शालेयवृत्त सेवा
0

  



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड महानगरपालिकेचे माजी शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या 'अनाहत' काव्यसंग्रहाचे प्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या हस्ते दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे.


नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशन संस्थेने हा काव्यसंग्रह प्रकाशनासाठी सिद्ध केला आहे.  महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अनाहतचे अमूर्त शैलीत देखणे मुखपृष्ठ तयार केले आहे. 


सहस्रकुंड येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यास मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार, बाल साहित्यिक, कवी पंडित पाटील आदींची मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


व्यंकटेश चौधरी यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे गंधबन (निर्मल प्रकाशन), एक शून्य प्रतिक्रिया (शब्दालय प्रकाशन) हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच बालकुमार वाचकांसाठी लिहिलेले लालबहादूर शास्त्री, तत्त्वज्ञ आचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन ही पुस्तके इसाप प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. 


व्यंकटेश चौधरी यांची 'घर', 'निर्णय' या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए आणि एमएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. तर 'मन्याडीच्या कुशीत' हा ललित लेख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होता. त्यांचा 'एक शून्य प्रतिक्रिया' हा काव्यसंग्रह सध्या नांदेड विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात आहे.


व्यंकटेश चौधरी यांनी कथा, कविता, समीक्षात्मक लेखन केले असून त्यांच्या काव्यसंग्रहांना यापूर्वी विविध पुरस्कार मिळाले आहेत. १६ जून रोजी सहस्रकुंड येथे होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक दत्ता डांगे आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)