छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत श्री सरस्वती भुवन प्रशाला, जालना येथील विद्यार्थिनी कु. श्रेया विनोद गाडगे हिने राज्याच्या रणांगणावर आपली तेजस्वी छाप उमटवली. १७ वर्षाखालील मुलींच्या फॉईल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत श्रेयाने राज्यविजेतेपदाचा मान मिळवला.
अचूक नेमकेपणा, चपळाई आणि लक्ष केंद्रीत ठेवण्याची उत्कृष्ट क्षमता यांचा अप्रतिम संगम साधत तिने प्रतिस्पर्ध्यांना चकवले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. तिच्या या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक श्री. हेमंत जोशी आणि श्री. किशोर नावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
श्रेयाच्या विजयी कामगिरीबद्दल शालेय समिती अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक श्री. युवराज पाडळे, क्रीडाधिकारी श्रीमती लता लोंढे, श्री विजय गाडेकर, श्री रोहन वाघमारे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
श्री. स. भु. प्रशालेच्या श्रेयाने साधलेले हे तेजस्वी राज्यस्तरीय यश संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले असून पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .