नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
प्राथमिक शाळा शेंबोली (ता. मुदखेड) येथे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि श्रमाचे महत्त्व रुजवण्यासाठी ‘आनंदनगरी खरी कमाई’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करून प्रत्यक्ष कमाईचा अनुभव घेतला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्यामध्ये भेळ,पाणीपुरी,भजी,आलूपराठे,बालूशाही,मुरमुरे चिवडा,मसाले पापड,इडली वडा,कोथिंबीर वडी,वडापाव,ब्रेड पकोडा आदी विविध स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉलची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः सांभाळली. कच्चा माल नियोजन, किंमत ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे व हिशोब ठेवणे याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, निर्णयक्षमता आणि आर्थिक नियोजन कौशल्य विकसित झाले. पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेतील शिक्षक रामकृष्ण लोखंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‘आनंदनगरी खरी कमाई’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून ‘शिकत कमवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा आहे.”तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबन,व्यवहारीक ज्ञान,नफा तोटा या विषयी माहिती होते असे नमुद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी कमावलेली रक्कम साठवण व सामाजिक उपयोगासाठी कशी वापरावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम दुबेवाड,ग्रामसेवक प्रकाश पाटील,बालाजी कल्याणकर,शिद्धोदन गोवंदे,बाळू मुंडकर मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर,रामकृष्ण लोखंडे,मंगला महाजन,सुनिता केंद्रे,जयश्री गायकवाड,छाया मठदेवरु,संगिता वादळे,शापोआ मदतनीस गोविंद गोरेवाड विद्यार्थी,पालक,व ग्रामस्थ उपस्थित होते


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .