(समीक्षण – श्री देवीदास फुलारी, सदस्य म.सा.प. व सदस्य अ. भा. साहित्य महामंडळ) लेखक आणि अध्यापक असलेले श्री प्र. श्री. जाधव यांच्या ‘मन्याडीचे डोह’ हा कवितासंग्रह वाचला. नदीने प्र. श्री. जाधव यांच्यावर केलेल्या संस्काराचा धांडोळा या कवितासंग्रहाच्या पानापानावर आढळतो. मला चालायला येण्याअगोदर पोहायला येत होते, हे अभिमानाने सांगणारे प्र. श्री. जाधव अर्थातच नदीला आई इतकेच प्रिय मानतात. बालावस्थेत असलेल्या प्र. श्री. जाधव यांना त्यांची आई काखेत घेऊन मन्याड नदीत धुणं धुण्यासाठी जायची. आणि इथूनच कवीचे आणि नदीचे एक नाते निर्माण झाले. या नात्याचा एक अत्यंत निखळ अन्वय म्हणजे या कविता होत. या नदीचे विभ्रम कवितेत अभिव्यक्त करताना हा कवी मागील पाच दशकातील सामाजिक आणि सांस्कृतिक स्पंदने या कवितेमध्ये अधोरेखित करीत आहे. मन्याड काठचा गाव माझा मन्याड माझ्या मनामनात मन्याडीचे पाणी असे की फुलून येते कणाकणात मन्याड काठाची माती अशी की पिकते फुलते पानापानात मन्याडकाठची नाती अशी की भरते बहरते जनामनात.... ‘नदी ही जीवनदायिनी असते. तिच्यावरच आपला देह पोसलेला असतो. म्हणूनच तिला माता म्हणतात’ पाठराखण करताना प्रा. नारायण शिंदे यांनी केलेले विधान ‘मन्याडीचे डोह’ या संहितेचा सारांश सांगून जातात. नदीचे पाणी जणू सामाजिक अभिसरण शिकवते मन्याडीच्या खोऱ्यात शिवलिंग बादशहा इथे नांदती सुखाने दोन धर्म एकश: अशा मन्याडीच्या खोऱ्यात हाजीसय्याचा उरूस ओढा कोणीही साखळी मन मुरादी हुरूप क्षमा करण्याचा गुण नदीकडून शिकण्यासारखा आहे नदीला कितीही त्रास द्या, ती मात्र आशीर्वादच देत राहते . जीवनाच्या डोहामध्ये किती सापळे लावलेले मनाच्या मासळीला कोण कोण टपलेले गळ घालून उभे कोणी कोणी जाळे लावलेले ढवळती डोह कोणी कोणी धार बांधलेले.... एकंदरच ‘मन्याडीचे डोह’ मधील कविता वाचनीय झालेली असून प्रत्येकाला नदीच्या सान्निध्यात घेऊन जाते. -देवीदास फुलारी, नांदेड ( सदस्य म. सा. प. व सदस्य अ. भा. साहित्य महामंडळ )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .