नंदुरबार ( शालेय वृसेवा ) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार तसेच नवापूर तालुकास्तरीय शिक्षण विभाग समग्र शिक्षा आयोजित व अर्पण संस्थेच्या सहकार्याने नुकतेच पी. ए. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल लौंगिक शोषण प्रतिबंध व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाने शालेय शिक्षण व्यवस्थेतील बदलत्या जबाबदाऱ्यांना नवी दिशा दिली आहे. ‘शाळा’ ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून, मुलांच्या सुरक्षिततेचे पहिलं संरक्षक कवच आहे. ही जाणीव प्रत्येक शिक्षकांच्या कार्यपद्धतीत रूजवणे ही काळाची अत्यावश्यक मागणी बनली आहे.
जबाबदारीची जाणीव प्रशिक्षणाच्या प्रथम टप्प्यात तब्बल १४६ प्रशिक्षण देण्यात आले आहेत. उर्वरित तीन टप्प्यात ५४६ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षक वर्गातील उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश देसले यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. किशोर रायते, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. शिलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख श्री. योगेश महाले ,केंद्रप्रमुख श्री बाबुराव वसावे, केंद्रप्रमुख शरद गावीत, केंद्रप्रमुख श्री. भगवान सोनवणे, आदींच्या उपस्थितीत शिक्षक वृंद यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले. सखोल प्रशिक्षण, संवेदनशील विषयाची, संवेदनशील मांडणी अर्पण संस्थेचे प्रशिक्षक प्रशांत गीते, मनस्वी कुंदु, नुपूर लांडगे व शांतीलाल रिकिबे यांनी शिक्षकांची पूर्व-चाचणी घेऊन प्रशिक्षण प्रक्रियेला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.
प्रशिक्षणादरम्यान बाल लैंगिक शोषणाचे मानसिक, शारीरिक व वर्तणुकीचे संकेत,वैयक्तिक सुरक्षा, शिक्षण, जोखीम असलेल्या मुलांची ओळख, तातडीची हस्तक्षेप पद्धत यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशिक्षकांनी अतिसंवेदनशील व प्रतिकूल घरगुती परिस्थितीत राहणाऱ्या मुलांमध्ये शोषणाची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे शिक्षकांजवळ भावनिक संवेदनशीलता आणि तर्कशुद्ध निरीक्षण क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण क्षेत्राचे विस्तारीत कर्तव्य गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश देसले यांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक व शारीरिक सुरक्षेत शिक्षकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते नसून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनरक्षणाशी जोडलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे त्यांनी अधोरेखित केले. धोरणात्मक प्रगती, जबाबदारीचे सातत्य, राष्ट्रीय आरोग्य व कल्याण कार्यक्रमांतर्गत शालेय अभ्यासक्रमात वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा समावेश हा शिक्षण व्यवस्थेच्या धोरणात्मक परिपक्वतेचा उत्तम नमुना ठरत आहे. मात्र ही अंमलबजावणी दृष्टीकोन आणि आचरणात सातत्याने प्रतिबिंबित झाली तरच त्याचा खरा परिणाम दिसून येईल.
संवेदनेचे सामर्थ्य
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी सांगितले की, “बालकांचे संरक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून समाजाची सामूहिक नैतिक बांधिलकी आहे. शिक्षकांच्या संवेदनशीलतेतून आणि सहकार्याच्या संस्कृतीतूनच सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण पिढी घडेल.” असेही मत व्यक्त करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते प्रशिक्षण समन्वयक यांनी लैंगिक अत्याचार संदर्भातील कायद्याची माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आली.
नवापूर तालुक्यातील हा उपक्रम शिक्षण व्यवस्थेच्या मानवी मूल्यांचे उत्तम उदाहरण म्हणून स्मरणात राहील. बाल सुरक्षा ही आज फक्त शैक्षणिक कल्पना नाही, तर व्यवहारात रुजवायचे राष्ट्रीय ध्येय आहे. या प्रयत्नांमधून निर्माण होणारी जागरूकता मुलांना सुरक्षित भविष्य सुधारण्यास मदत होईल. शिक्षकांना नैतिक बळ मिळेल. समाजाला सुसंस्कृत दिशा देणारी ठरेल. असेही मत व्यक्त केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .