मुदखेड ( शालेय वृत्तसेवा ) :
ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था संचलित जिजामाता प्राथमिक शाळा, मुगट, ता. मुदखेड, जि. नांदेड येथील विद्यार्थिनींनी सन २०२५-२६ च्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या परीक्षेत इयत्ता सातवीतील कु. श्रुती बालाजी कोकणे व कु. श्रावणी मारुती गझले, तसेच इयत्ता चौथीतील कु. शिवन्या जाधव या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. अत्यंत परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित सराव आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळा, पालक व संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना विद्यार्थिनींनी नियमित अभ्यासाबरोबरच विविध सराव परीक्षा, प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास आणि वेळेचे प्रभावी नियोजन केले. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करून त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा दिली. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन व सहकार्य दिल्यामुळे हे यश शक्य झाले.
विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व इतर विविध क्षेत्रांत अशाच प्रकारे यश मिळवून शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केली.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .