शैक्षणिक परिवर्तनाचा ध्यास असलेला योद्धा- डॉ. हेमंत कार्ले

शालेयवृत्त सेवा
0

 



शैक्षणिक परिवर्तनाचा ध्यास असलेला योद्धा- डॉ. हेमंत कार्ले


         गेली ३६ वर्षे सतत प्राथमिक शिक्षक ते राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा देणारे आजच्या तमाम शिक्षक वृंदांमधील अत्यंत महनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे डॉ. हेमंत कार्ले हे दि. ३१ जुलै २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बारड येथून सेवानिवृत्त होत आहेत. केसराळी ता. बिलोली जि. नांदेड येथे १४ जुलै १९६८ रोजी जन्माला आलेल्या डॉ. कार्ले यांनी आपल्या गावातल्याच शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १९८४ साली देगलूरच्या साधना हायस्कूलमधून ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. नांदेड येथेच उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ पर्यंत शिक्षणशास्त्र पदविका मिळविली. नांदेड शहरात स्थित असलेल्या लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत एक वर्ष एक महिना शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केल्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत आले.             

        हदगाव तालुक्यातील हरडफ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १५ सप्टेंबर १९९० रोजी रुजू झाले. इथूनच त्यांच्या शैक्षणिक चळवळीला प्रारंभ झाला. २००६ ते २०२६ तब्बल दोन दशकांच्या कालावधीत एक उत्तम दर्जाचे इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. ही देतानाच अनेक चळवळींमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. इंग्रजी विषयाच्या अध्यापनात शाळा, जिल्हा व राज्यस्तरावर विविध उपक्रमांत सहभागी झाले तसेच काही उपक्रमांचे आयोजनही त्यांनी केले. त्याचबरोबर काही कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे व परिषंदांचेही आयोजन केले आहे. सेवाकाळात डी. पी. ई. पी. व सर्व शिक्षा अभियान या प्रकल्पात टीएलएम प्रमुख व प्रकल्प लेखनात विशेष योगदान दिले आहे. शिक्षकीपेशा सोबतच लोकविज्ञान तथा सामाजिक प्रबोधन चळवळीत ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी घालविला आहे. शैक्षणिक, सामाजिक तथा सांस्कृतिक परिवर्तनाचा ध्यास असलेला योद्धा म्हणून त्यांना ओळखले जाते. 


          डॉ. हेमंत कार्ले यांनी सन १९९२-९४ मध्ये संपूर्ण साक्षरता अभियानांतर्गत नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले. समकाळात आणि त्याहून पाच वर्षांचा अधिक काळ लोकविज्ञान चळवळीत घालविला. भारत ज्ञान विज्ञान समिती या शिक्षण व लोकविज्ञान चळवळीसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत नांदेड जिल्हा निमंत्रक, मराठवाडा समन्वयक व महाराष्ट्र राज्य सह-समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी बालोत्सव, बालविज्ञान उत्सव, सीखने का मजा म्हणजेच जाॅय ऑफ लर्निंग, खग्रास सूर्यग्रहण प्रबोधन कार्यशाळा अशा काही उपक्रमांचे आयोजनही त्यांनी केले होते. याबरोबरच ते शिक्षक संघटनेतही काम केले आहे. १९९७-९९ मध्ये म. रा. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व नंतर मराठवाडा समन्वयकही राहिले. तसेच २००६ ते २०१२ पर्यंत जि. प. माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या काळात शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. 


         तद्वतच १९८७-८९ मध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थ्यांच्या लढाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले. याच काळात मराठवाड्यातील कन्नड ते नायगाव बा. दरम्यान निघालेल्या हमारा भारत या राष्ट्रीय अभियानांतर्गत डंकेल प्रस्तावविरोधी सायकल जत्थ्याचे नेतृत्व त्यांनी केले. अशा प्रकारे ते शैक्षणिक, सामाजिक चळवळीत होतेच. तसेच साहित्य चळवळीतही आपला सहभाग नोंदविला आहे. १९९९ मध्ये त्यांनी पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक विचारवेध संमेलनाचे आयोजन केले. २०१७ मध्ये ख्यातकीर्त लेखक डॉ. यशवंत मनोहर आणि सुप्रसिद्ध पत्रकार संजय आवटे यांच्या उपस्थितीत एकदिवसीय राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे यशस्वीरीत्या आयोजन केले होते. अगदी याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात नांदेड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजनात प्रमुख भूमिका निभावली होती. 


          डॉ. कार्ले यांनी आपल्या आयुष्यात अध्यापनाचे कार्य हाती घेतले होते. त्यासोबतच त्यांनी आपले चारित्र्य जपले. शिलाला जपले. आपल्या चारित्र्यावर कोणताही डाग लागू दिलेला नाही. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यविषयक चळवळीत आपल्या परीने काम करीत असताना त्यांनी स्वतःला शैक्षणिकदृष्ट्या अद्ययावत ठेवले. सेवाकाळात बीए, एमए, बीएड, एमएड, सेट, पीएचडी, एलएलबी, एलएलएम पर्यंत शिकत राहिले. अजूनही त्यांची शिकण्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. त्यांना २००८ मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यस्तरीय राज्य पुरस्कार मिळाला. २०१६ मध्येच शाळा सोडणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रश्नावर महत्वपूर्ण संशोधन करून पीएचडी पदवी मिळवली. त्यांचे तीन पुस्तकेही प्रकाशित आहेत. एक मराठीत आहे तर दोन इंग्रजीत आहेत. जमीन आमची काळी आई हे मराठीत तर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले लिटिल ओरिएटर्स आणि लेट्स लर्न इंग्लिश अँकरिंग असे दोन पुस्तके गतवर्षी त्यांच्या बारड येथील शाळेतच प्रकाशित झाली आहेत. 


         डॉ. कार्ले हे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अगदी समाधानी असून मनात कसलीही रुखरुख नसल्याचे ते सांगतात. त्यांच्या सहचारिणी आदर्श शिक्षिका असून दोन्ही मुली उच्च विद्याविभूषित आहेत. डॉ. अनुजा कार्ले सहाय्यक प्रपाठक म्हणून पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत तर डॉ. अनार्या कार्ले ह्या ठाणे येथे न्युराॅलाॅजिस्ट आहेत. तद्वतच दोन्ही जावई अनुक्रमे इंजिनिअर आणि डॉक्टर आहेत. त्यांचा मित्र परिवारही खूप मोठा आहे. सतत संवाद साधणं आणि माणसं जोडत राहणं हा त्यांचा छंदच आहे. त्यामुळे अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे तसेच कशाचीही ददात राहणार नाही अशा शुभेच्छा आणि मंगल कामना व्यक्त केल्या जात आहेत. पुढील आयुष्य शिक्षण, समाज आणि साहित्य यासाठी खर्ची पडावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. !


    - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)