राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ देण्यासाठी प्रयत्न करीन : डॉ. भोयर

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्यस्तरीय शिक्षक संमेलनांचे शानदार उद्घाटन ! अनेक विषयावर चर्चा..

पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या वतीने ओळखपत्र देणार !


वर्धा, ( रमेश मुनेश्वर ) :

शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणण्याची ताकद केवळ समर्पित शिक्षकच करू शकतात आणि त्यात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याने अंमलात आणलेल्या नवीन शिक्षण पद्धतीत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश लवकर करण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर केले. ते राज्यस्तरीय शिक्षक संमेलेनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.


ते पुढे म्हणाले पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ देण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत व शिक्षण प्रशासनसोबत चर्चा करून व अन्य सकारात्मक निर्णय घेणार आहोत. या सोबतच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासकीय ओळखपत्र व त्यांची नावे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्याची कार्यवाही आपण त्वरित करणार आहोत, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.


सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम शांती भवन येथे १ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस होते तर अनिल शिवणकर, राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, कार्याध्यक्ष दशरथ शिगारे, राज्य प्रवक्ते सुनील गुरव, राज्य प्रतिनिधी देवेंद्र गाठे व जिल्हाध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर व्यासपीठावर उपस्थित होते.


रामदास तडस म्हणाले, राज्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा अनुभव व ज्ञानाचा उपयोग राज्य सरकार करणार असून शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याचा प्रयत्न केल्या जाईल.


कॅप्टन मोहन गुजरकर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षण व्यवस्थेत प्राधान्य देण्यात यावे व शिक्षकांना दोन वेतनवाढी देण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी केली. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे, रंजना दाते यांच्यासह महाराष्ट्रातून अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)