जुन महिना आला. शालेय साहित्यांनी दुकाने फुलू लागली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या पालव्या फुटू लागल्या. पालक पाल्यांच्या आनंदानं भारावून जावू लागले. मनातील स्वप्नाची पूर्तता करण्याचा मौसम बहरुन आलेला होता. आणि कान शाळेची घंटा ऐकण्यासाठी आतूर झाले होते.
विद्यार्थ्यांचा बाजारात जाण्याचा आनंद वाढला होता. दुकानातील नवीन दप्तरे,नवीन गणवेश,जणू विद्यार्थ्यांना खुणवत होती. तर नवीन वह्या आणि पुस्तके हसतमुखाने हस्तांदोलन करण्यासाठी आतूर होती. नवीन वर्ग आणि बोलक्या भिंती स्वागतासाठी सज्ज झालेल्या होत्या. पालक पाल्यांची पुढील वर्गातील बढती पाहून अभिमानाने वावरत होती. तर आईच्या आनंदास पारावार नव्हता. कारण काही मुले वडिलांच्या बोटाला धरून पहिल्यांदाच शाळेचा उंबरठा ओलांडणार होते.. यासाठी शाळेच्या आवारातील घंटानाद कधी कानावर येईल. म्हणून कानात जीव आणून सर्वजन ऐकायला आतूर झालेले होते. एवढ्या उत्सुकतेच कारणही तसच होत. ते म्हणजे जागतिक महामारी.
कारण मागील वर्षीपासून कोरोना महामारीने धुडगूस घातलाय. आणि देशातच नाही तर जगात हाहाकार केलाय. यामुळे मानसिक, आर्थिक, शैक्षणिक हानी उद्भवली आहे. शाळा कार्यालय ,बाजारपेठ ,वाहतूक यावर निर्बंध लागले आहेत. तरीही पहिल्या कोरोना लाटेवर आम्ही मात केली आहे. सर्व सुरळीत पूर्व पदावर येत असतानाच पुन्हा दुसऱ्या लाटेने मानसाला होत्याच नव्हते केले. यावरही आम्ही लसीकरणाच्या माध्यमातून मात करीत आलो आहोत.
यामध्ये सर्व क्षेत्रांबरोबरच शिक्षणक्षेत्र संकटात सापडले आहे. पण शासनाने 'शाळा बंद आहे. शिक्षण सुरु आहे'. ह्या उपक्रम द्वारे आँनलाईन, दूरदर्शन मार्फत शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हा प्रयोग काहीसा यशस्वीही आहे. तर ग्रामीण भागातील वीजेचा लपंडाव,भ्रमणध्वनी,अथवा नेटवर्किंगची कमतरता,या असुविधामुळे हे शिक्षण पोहचण्यास अडचणीयेत आहेत.
पण विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होवू नये. आणि महामारीत त्यांची जीवीत हानी होऊ नये, शैक्षणिक वर्ष वाया जावू नये. हा विचार समोर ठेवून शासनाने शैक्षणिक नुकसान न होता परीक्षा रद्द झाली तरी पुढील वर्गात प्रवेश देवून ही झीज भरुन काढली.हे स्वागतार्ह आहे. याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलाच. पण पालकांमधून काहीसा नाराजीचा सुरही पहायास मिळाला. कारण आपोआप पुढच्या वर्गात जाण यातून त्याची शैक्षणिक प्रगती काय, याचा अंदाज येणं त्यांच्या साठी कठीण झाले.मुल्यमापनाची साशंकता त्यांच्या मनात जाणवली. काही वर्ग तर पुढील जीवनातील महत्त्वाचे बदल घडवून आणणारे असतात. उदा.दहावी, बारावी नंतर शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा खुल्या असतात. पण आपोआप पास होण्याने आत्मविश्वासाने एखादया क्षेत्रात तो उडी घेऊ शकणार नाही. म्हणून पालकांच्या मनात शंकेची पाल चुकणे साहजिकच आहे. कारण पालक मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असतात. आपला भावी काळ, वैभव ते मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बघत असतात. म्हणून ते शैक्षणिक खतपाणी घालून पीकरुपी पाल्यास वाढवत असतात.अस म्हणतात की, शरीराला जेवढी अन्नाची गरज लागते, तेवढीच आपण जगताना शिक्षणाची गरज लागते.
म्हणूनच मानसाला शिक्षणाच्या गरजची पुरेपर पूर्तता व्हावी. तरच तो भावी आयुष्यात कुठेही अडखळणार नाही. ज्ञान हे सर्व समस्याची गरुकिल्ली आहे. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले होते. कारण आपल्या देशाची प्रगती ही शिक्षणावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्या मुलांचे शिक्षण कसे प्रभावी होईल,यासाठी प्रत्येक बाप जागरुक असतो.आणि या भयावह काळामध्ये पालक चिंताग्रस्त होताना दिसतो आहे. कारण शाळेत शिस्त,मूल्यशिक्षण आणि सुसंस्कारात त्यांची वाढ होत असते. शाळेविना तो बेशिस्त, व्यसनाधीन होण्याची भीती पालकांच्या मनात आहे. एवढेच नाही तर यातून बालमजूरी वाढण्याचा धोकाही नाकारता येत नाही. म्हणूनच शाळेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
कारण आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. एवढ्या नुकसानकारक महामारीस सर्वांनी एक होवून लढा दिला. आणि यशही मिळाले. हळुहळू जनजीवन पूर्व पदावर येत आहे. माणुस भितीदायक वातावरणातून बाहेर येत आहे. बऱ्याच प्रमाणात लसीकरण झालेले आहे. लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. कारण लसीकरणच यावर एकमेव उपाय आहे.पण त्यासाठी सतर्कताही तेवढीच महत्त्वाची आहे. शासनाचे नियम पाळणेही आवश्यक आहे. हळूहळू लागलेली निर्बंध उठवली जात आहेत. महामार्गावर बसेस धावत आहेत. ईतरही ठिकाणा वरील निर्बंध हळुहळू कमी होत आहेत. हे सर्व बघून पालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलत आहे. लवकरच शाळा सुरु होईल, या अपेक्षेने पालकांमध्ये चर्चेला उधाण येत आहे.
कारण शाळा सुरू होतील. त्यांचे लसीकरण होईल.मुले खेळतील बागडतील. रोगाविषयी नवनवीन सुचना, मार्गदर्शन, समुपदेशन ऐकतील आणि ते घरी सांगितील. तसेच पालकही सजग होतील. कारण एम्सच्या डॉक्टरांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी काळजी घेवून तिला कसं परतवून लावता येईल. हेही बघण्याची गरज आहे. ती जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची आहे. शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन हे आपल्याला करावच लागणार आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपणच या तिसऱ्या लाटेला थोपवू शकतो.
ही जबाबदारी प्रत्येक घटकाची आहे.याबरोबरच आपल्या मनातील भीती कमी करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या संकटाला घाबरून जाण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी निर्भीड झाले पाहिजे. महामारी ही वाघ होवून आलेली आहे, आपण घाबरलो तर ते आपणास खाते आणि हिम्मतीने लढलो तर ते पळून जाते.
यावर उपाय म्हणून घाबरून न जाता सर्व नियम पाळूत. लसीकरण करून घेवू. हे संकट पळून जाईल. आणि पुन्हा शाळेला हसरे दिवस येतील.
चला आपण अपेक्षा करुया. आपण यशस्वी होवू. यासाठी शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करुया. आणि आपल्या आकांक्षाची पुर्तता करण्यास सफल होवू या. आणि विद्यार्थ्यांच्या मनातील स्वप्ने पूर्ण करु या.
-बाबुराव पाईकराव
डोंगरकडा- 9665711514
.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .