मराठवाडा मुक्ती संग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान..

शालेयवृत्त सेवा
0

 



१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारत देश विविध संस्थानामध्ये विखुरलेला होता. एकूण ५६५ संस्थाने होती. त्यापैकी ५६२ संस्थाने भारतात विलीन झालेली होती. पण काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद संस्थानांनी अद्याप भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. त्यापैकी हैद्राबाद संस्थान देशात आकाराने मोठे असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. तथापि  देशाच्या मध्यभागी असलेले ते महत्त्वाचे राज्य होते. ते स्वतंत्र राज्य म्हणून जनतेच्या किंवा देशाच्या हिताचे नव्हते. त्यामध्ये तेलंगणा,मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग होता.


त्यांची लोकसंख्या एक कोटी साठ लाख होती. तसेच हे संस्थान भारतात विलिन होणे फार महत्त्वाचे होते.पण ११जून १९४७ रोजी आपले राज्य स्वतंत्र होणार आहे हे जाहीर केले. या निर्णयामुळे भारत सरकार आणि हैद्राबाद राज्यातील जनतेपुढे पेचप्रसंग निर्माण झाला. हैद्राबाद राज्याचा सत्ताधीश हा मुस्लिम होता. त्याचे नाव निजाम मीर उस्मान अलिखान बहादूर नियामुद्दौला निजाम उल मुल्क आसफजाह हे होते.त्याचा सेनापती कासिम रझवी होता. त्याने त्याच्या रझाकार या संघटनेद्वारे नागरिकांवर अन्याय अत्याचार सुरू केले. आणि ही संघटना गावागावात पोहोचली. ह्या अत्याचाराने जनता त्रस्त झाली होती.


तेव्हा त्या विरोधात आर्य समाज, स्टेट काँग्रेस, आणि स्टेट शेड्यूल कास्ट फेडरेशन या बरोबरच महिला आणि विद्यार्थी सुद्धा या लढ्यात सहभागी झाले.

हैद्राबाद मध्ये आर्य समाजाची स्थापना केशवराव कोरटकर यांनी केली होती. स्टेट काँग्रेसचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ हे करीत होते. आणि स्टेट शेड्युल कास्ट फेडरेशनचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते.


१९३८ ते १९४८या काळात हैद्राबाद संस्थानात सभा,परीषदा, मेळावे, संमेलने आणि परिसंवाद घेण्यास निजामाने मज्जाव केला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या परीषदा, सभा कधी जळगाव, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्याच्या सिमेवर, मुंबई राज्यातील सिमेवर तर कधी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर घेतल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाड्यात ३० डिसेंबर १९३८ साली मक्रणपूर ता.कन्नड जि.औरंगाबाद येथे निजामाच्या विरोधात दलित पीडित, शोषित, शेतमजूर, श्रमिक, भूमिहीनांना स्वाभिमानी जीवन जगण्याची व समाज परिवर्तनाची दिशा देणारी पहिली परीषद भरविली. त्यातून त्यांनी 'निजाम चले जाव' हा नारा बुलंद केला होता. या लढ्यात 'शेड्युल कास्ट फेडरेशन' ही अग्रभागी होती. हे यावरुन दिसून येईल.


हा लढा सर्वजन एक होऊन  लढत होते. त्यात अनंत भालेराव,गोविंदभाई श्राँफ ,दिगंबर बिंदू, विजयेंद्र काबरा, देविसिंह चव्हाण, रविनारायण रेड्डी,भाऊसाहेब वैंशपायन, बाबासाहेब परांजपे, आणि बहिर्जी वापटीकर तसेच या कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग होता. त्यात आशाबाई वाघमारे, सुशिला दिवाण, सुलोचनाबाई बोधनकर, गिताबाई चारठाणकर, प्रतिभाबाई वैशपायन, दगडाबाई शेळके, तारा परांजपे आणि करुणाबाई चौधरी ह्या होत्या.


त्या काळात भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

त्यांनी निजामापुढे भारतात सामील होण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. पण त्याकडे निजाम सरकारने व कासिम रझवीने दुर्लक्ष केले. आणि उलट  रझाकाराच्या फौजा वाढविल्या. त्यांनी जनतेवर अतोनात अत्याचार केले. आणि हा लढा गावागावात पोहोचला. तेव्हा भारत सरकारला हैद्राबादच्या संस्थानाच्या विलिनीकरणासाठी लष्कर कारवाईचा निर्णय घ्यावा लागला. पण लष्कर कारवाई मुळे आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या कारवाईस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'पोलीस अँक्शन' हे नाव देण्याची सूचना भारत सरकारला केली.आणि ती कारवाई 'पोलीस अँक्शन' म्हणून नोंदवली गेली.


गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ ला पोलीस अँक्शन कारवाई  केली. आणि भारत सरकारच्या लष्करी कारवाई पुढे हैद्राबाद राज्याचे पोलीस लष्कर आणि रझाकार तग धरु शकले नाही.


परिणामी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादचे शेवटचे आणि सातवे निजाम मीर उस्मान अलिखान बहादूर याने भारत सरकार समोर शरणागती पत्करली.आणि  हैदराबाद राज्य भारतात विलिन झाले. आणि मराठवाडा स्वतंत्र झाला.


शेवटी म्हणावसे वाटते, निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैद्राबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नैतिक बळ मिळाले होते.


त्यांचा विचार घेवून शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने एकतेचा विचार घेवून लढलेला बहुजन समाज यांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे म्हणावे लागेल. हा लढा तळागाळातील स्तरावर लढल्या गेल्यामुळे त्यात श्रमिक, कामगार, बहुजन, शेतकरी,महिला आणि विद्यार्थी यांचा सुद्धा हिरिरीने सहभाग होता. म्हणजेच हा लढा एक लोकलढा होता. ते एकीचे बळ होते. भारतीयांचा विश्वास होता.आणि जनतेच्या यशाचे ते एक तेजस्वी पर्व होते. म्हणून १७ सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती दिन' म्हणून आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.


-बाबुराव पाईकराव

डोंगरकडा

9665711514

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)