महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे शालेय शिक्षण सचिवांना निवेदन
नांदेड- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शालेय शिष्यवृत्ती परीक्षा व प्रवेश शुल्कामध्ये दिनांक 11 नोव्हेंबर च्या शासन निर्णयाने मोठी वाढ करण्यात आली आहे राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची केलेली ही शिष्यवृत्ती फी वाढ मागे घेण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण सचिव यांना नुकतेच पाठवण्यात आले.
संदर्भीय शासन निर्णयानुसार इयत्ता 5 वी, 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नोंदणी व परीक्षा फी रकमेत 20 वरून 50 आणि 60 वरून 150 अशी मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच जिथे मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना 0 परीक्षा शुल्क होते ते 75 रुपये करण्यात आले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणारे नाही त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षेला बसवण्याचे टाळू शकतात त्यामुळे ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व पुढील शिक्षणाची सोय करण्यासाठी वर्षातून ही एकच परीक्षा असते त्यामुळे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार किमान हा भार शासनाने उचलणे अपेक्षित आहे.
करिता राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी वाढ मागे घेऊन जुनेच प्रवेश व परीक्षा शुल्क कायम ठेवण्यात यावे ही संघटनात्मक विनंती निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर पुरोगामी चे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे , जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख एस एस पाटील यांनी दिली आहे.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .