मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक ०८ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत. www.mahresult.nic.in
या परीक्षेस राज्यातून १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पैकी ८,१७,१८८ एवढी मुले असून ६,६८,००३ एवढ्या मुली आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.
यासाठीच्या सविस्तर सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजना उपलब्ध राहील. या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपासून वितरित करण्यात येतील. इयत्ता १२ वी परीक्षेच्या कामांमध्ये सहकार्य केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व राज्य मंडळातील तसेच सर्व विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी आभार मानले असून परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .