मूलगामी परिवर्तन घडवून आणणारा महामानव
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा जन्म २३ जानेवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. केवळ डेबूजी झिंगराजी जानोरकर हे नाव वाचले, तर व्यक्तिपरिचय होणे कठीण आहे, मात्र गाडगे बाबा म्हणताच व्यक्ती, कार्य आणि त्यांचे समस्त जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ म्हणत अध्यात्माच्या मार्गातून त्यांनी समाजप्रबोधनही केले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा अभंग कानावर पडल्यावर महाराष्ट्रातल्या माणसाला आपसुकच संत गाडेगबाबा यांची आठवण येते. शिक्षण, स्वच्छता, भूतदया, अंधश्रद्धेवर प्रहार या तत्त्वावर आयुष्यभर काम केलं. महाराष्ट्राला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या संत गाडगेबाबा यांची आज २० डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. जयंती आणि पुण्यतिथीला स्वच्छतेचे पुजारी, स्वच्छतेचे महामेरू म्हणून ओळख करून दिली जाते. त्यांनी गावोगावी जाऊन स्वच्छता केली आहे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले हे निर्विवाद आहेच परंतु बाबांचे कार्य आणि महिमा अगाध आहे. ते पुढे आले पाहिजे. गाडगेबाबांचा जन्म परीट घराण्यात झाला म्हणून समाजव्यवस्थेत कपडे धुण्याचा आणि इस्री करण्याचा संदर्भ लावून त्यांना व्यवस्थेचा त्या स्तरावर ठेवण्याचा आजच्या मनोवृत्तीचा मनसुबा उधळून लावला पाहिजे. तसेच जो जातसमुह ही मानसिकता योग्य आहे, हे मान्य करतो. हेही चुकीचे आहे. त्यांच्या जुन्या नावाने जात सांगितली गेली तरी गाडगे बाबा परीट घराण्यात जन्माला आले हे वाक्य सतत लिहणे आणि बोलणेही चुकीचेच आहे. अशा विचारसरणीचा प्रारंभीच निषेध नोंदवतो. सरकारची गरज असली तरीही गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला गेला. हे अभियानही गाडगेबाबांचा मानसन्मान वाढवित नसून ते त्यांना परीटच ठरविते. किमान यापुढील काळात तरी ही मानसिकता बदलली पाहिजे, यासाठीच हा लेखप्रपंच. गाडगे बाबांनी केवळ समाज स्वच्छ केला नाही, तर लोकांची मनेही अंतर्बाह्य स्वच्छ केली. अशा या महामानवाने २० डिसेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. परंतु जाता जाता समाजाला आपल्या बहुमूल्य विचारांची देणगी दिली. त्यांना त्रिवार वंदन.
अमरावती जिल्ह्यातील शेणगाव त्यांचा जन्म झाला. संत गाडगेबाबा हे केवळ अमरावतीचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य अमरावतीसह विदर्भातील समाजजागृतीसाठी खर्ची घातले. संत गाडगेबाबांचे अमरावतीशी नाते केवळ जन्मापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या बहुतेक समाजसुधारणेच्या कार्याचा केंद्रबिंदू हाच परिसर होता. अमरावती शहर, धामणगाव, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर तसेच मेळघाट परिसरात त्यांनी सतत भ्रमंती करून समाजप्रबोधन केले. हातात झाडू घेऊन गावातील रस्ते, देवळांचे परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समाजाला पटवून दिले. अमरावती जिल्ह्यात त्या काळात असलेली अस्वच्छता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातिभेद यावर गाडगेबाबांनी तीव्र शब्दांत प्रहार केला. कीर्तन, भजन आणि भारुडांच्या माध्यमातून त्यांनी दारू पिणे, जुगार, हुंडा प्रथा आणि अस्पृश्यता याविरोधात जनजागृती केली. त्यांच्या कीर्तनासाठी अमरावती जिल्ह्यातील गावोगावी मोठी गर्दी होत असे. संत गाडगेबाबा हे कोणतेही अवडंबर न करता, केवळ एक गाडगे, काठी, कवडी आणि चिंध्या पांघरून समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढून खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणारे चालते-बोलते विद्यापीठ होते. आज देवालाही आदर्श माणसाची गरज आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर होणे सोपे झाले आहे, पण माणूस होणे कठीण झाले आहे. गाडगेबाबांचे कीर्तन हे उत्तम, आदर्श आणि सुसंस्कृत माणूस घडवण्याचा कारखाना आहे. स्वच्छता, देव, धर्म, अंधश्रद्धा, रूढी आणि माणूस हे विषय त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक होते. देवधर्म व देशधर्म सांभाळा हा काळाचा इशारा आहे. हा इशाराच आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला वाचवू शकतो. स्वच्छता तुम्ही जरुर करा पण गाडगेबाबांना जातीतच ठेवण्याची मानसिकता बदला.
गाडगे बाबा हे एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली असली तरी गरिबीतच त्यांचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेट देत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश होता.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, , व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. गाडगेबाबांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. १९३९ ला श्री सयाजीराव हायस्कूलचा कोनशिला समारंभ झाला होता. रात्री बाबांचे कीर्तन होतं. इथेही गाडगेबाबांनी त्या कीर्तनात मुलांना निरक्षर ठेवणं पाप आहे, त्यांना शिकवा, सावकाराकडून कर्ज काढू नका आणि कर्ज काढून सण करुन नका. तीर्थक्षेत्री जाऊ नका, नशा करु नका. शिक्षणाच्या पवित्र कार्यात भाऊरावांची मदत करा, असा संदेश गाडगेबाबांनी दिला. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोकांनी शिक्षणाच्या कार्यासाठी मदत केली. कौटुंबिक परिस्थितीमुळं गाडगेबाबा यांना शालेय शिक्षण घेता आलं नाही. लहानपणी गुराख्याच्या हातातील काठी हीच त्यांची पेन्सिल होती. काळ्या आईच्या पाटीवर नांगराची लेखणी करुन ते रेघोट्या ओढत राहिले. गाडगेबाबांवर संत तुकाराम महाराजांचा प्रभाव होता.
सर्वकाही सहजपणे लोकांना कळणाऱ्या शब्दांमध्ये गाडगेबाबा सांगत होते. कीर्तनात आर्तता व अंतःकरणात तळमळ आहे हे जाणवू लागल्यानेच बाबांची वाणी लोकांवर हुकुमत गाजवत होती. यामुळे कीर्तनात लोकांची गर्दी वाढत होती. संत गाडगेबाबा आषाढी आणि कार्तिकी वारीनिमित्तानं पंढरपूरला जात होते. मात्र, त्याकाळी विठ्ठल मंदिरातील भेदभावामुळं बाबा कधी देवळात गेले नाहीत. बाबांची किर्ती वाढत गेल्यानं गाडगेबाबा पंढरपूरला असले की त्यांनी मंदीर प्रवेश करावा, कीर्तन करावं, असा आग्रह स्पृश्य लोकही धरत पण गाडगेबाबा विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. संत गाडगेबाबांनी कष्टानं, जनतेतून पैसे गोळा करुन पंढरपूरमध्ये अस्पृश्यांसाठी धर्मशाळा उभी केली. १९२० च्या दरम्यान त्याचं कामं पूर्ण झालं. बाबांनी पुढं आणखी धर्मशाळा उभारल्या. गाडगेबाबांनी महाराष्ट्रातील पंढरपूर, माहूर, नाशिक आळंदी, विदर्भ, कोकण ते जबलपूर आणि रायपूर पर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम केले. आंध्र प्रदेश, हैदराबाद येथे कीर्तनाचे कार्यक्रम केले. गाडगेबाबांच्या कीर्तनात व्यसनमुक्ती, दारुबंदी आणि अस्पृश्यता निवारणचा समावेश होता. गाडगेबाबांनी गायींच्या संरक्षणासाठी गोशाळा उभारल्या. गाडगेबाबांनी महाराष्ट्रात धर्मशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात काम सुरु केलं होतं. बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला होता तो महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीला प्रेरक ठरला आहे. गाडगेबाबांनी स्वावलंबन आणि श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिलं. गाडगेबाबांनी शिक्षण प्रसारासाठी शाळा, वसतिगृहं, महाविद्यालयं काढण्याचं काम केलं. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं होतं. शिक्षणामुळे मानवाचा, समाजाची प्रगती होते. गाडगेबाबा म्हणायचे “मायबापहो तुम्हाला काहीतरी मिळालं पण तुमच्या मुलाबाळांच्या नशिबी तेही येणार नाही, शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं आहे, आपण शिका व इतरांनाही शिकवा.” गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्र.के. अत्रे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचे तर घनिष्ठ संबंध होते. गाडगेबाबांनी पंढरपूरची धर्मशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वाधीन केली होती. तीर्थयात्रेच्या वेळी येणाऱ्या मागासवर्गीयांच्या राहण्याची व्यवस्था फक्त तिथं करावी एवढी एकच विनंती गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झालं. बाबांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. त्यांनतंर अवघ्या १४ दिवसात संत गाडगेबाबांचं निधन झालं.
गाडगेबाबा जयंती गाडगेबाबांची दशसूत्री माणुसकीची शिकवण देणारी होती. लोकसंत गाडगेबाबा यांची दशसूत्री म्हणजेच माणसाला माणूस बनवण्यासाठी अंगीकारलेला मंत्र असल्याने त्यातून माणुसकीची शिकवण मिळते. त्यामुळे काही शाळा महाविद्यालयात या दशसूत्रीवर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतात, ते सर्वत्र झाले पाहिजेत. संत गाडगे महाराज देहूत येत असत. ते खरे वारकरी होते. त्यांना वारकर्यातलं क्रांतीकार्य पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली. गाडगेबाबांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. गाडगेबाबा अध्यात्म पचवलेले आणि देवत्वाचे मूल्य पचवलेले संत होते. गाडगेबाबांचा देव हा लोकांच्या कल्याणामध्ये रममाण होणारा आहे. तो दगडात नाहीये. माणसांमध्ये देव पाहणारे गाडगेबाबा संत परंपरेमध्ये वेगळा ठसा उमटवून जातात. पारंपरिक संतत्वाला चौकटीतून मुक्त करून एक मोकळेपणाचा अनुभव गाडगेबांनी लोकांना दिला. सर्व प्रकारची विषमता, अंधश्रद्धा यांना गाडगेबाबांच्या किर्तनात फाटा मिळालेला आहे. गाडगेबाबा निमित्तमात्र अध्यात्मवादी ते आहेत. त्यांचं कीर्तन पूर्णत: भौतिकवादी आहे. गाव साफ करणारे महाराज किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करतात. माणूस भौतिकदृष्ट्या सुखीसंपन्न व्हावा, अशाप्रकारची परिवर्तनवादी भूमिका गाडगेबाबा आहे. त्यांचं कीर्तन प्रबोधनकारी आहे, कल्याणकारी आहे. गाडगेबांबाचा काळ वेगळा होता. गाडगेबाबा कृतीशील संत होते. आधी केले, मग सांगितले, असे ते होते. चिंध्या पांघरूण सोन्यासारखा विचार देणारा संत म्हणजे गाडगे महाराज. पण, आता बदलणाऱ्या काळाप्रमाणे कीर्तन ऐकून मनाला आणि कानाला सुख वाटलं पाहिजे, असे काहींचे मत आहे. पण, किर्तनाच्या स्वरूपात काळानुरुप बदल आवश्यक आहेत. असे असले तरी आजच्या किर्तनकारानं आपल्या किर्तनातून चांगलं काय ते सांगावं. लोकांच्या उणीवा, त्यांच्या कमीपणाची खिल्ली उडवू नये. गाडगेबाबांनी किर्तनातून सर्व प्रकारच्या स्वच्छतेचा संदेश देशाला दिला. त्याप्रमाणे आजच्या तथाकथित संतांनी जातीयवाद, भ्रष्टाचार, राजकीय अनागोंदी, व्यसनमुक्ती, वासना यावरही बोललं पाहिजे. गाडगेबाबा ज्या गावात कीर्तनाला जायचे, त्या गावात जेवतसुद्धा नसत. आताचे किर्तनकार मात्र कीर्तनाचे पैसे ऍडव्हान्स घेतात. दिनचर्यापुरते पैसे घेणं ठीक आहे, पण त्यातून मी शाळा चालवतो, आश्रम चालवतो, अमुक करतो तमुक करतो हे सगळं सांगत सुटतात. येणारं २०२६ हे वर्ष सर्वत्र गाडगेबाबांचा जयंतीचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं झालं पाहिजे. जिथे जिथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे स्मारक उभारण्याची मागणी असेल तिथे तिथे ते उभारले गेले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने हे वर्ष गाडगेबाबा वर्ष म्हणून घोषित केले पाहिजे. हीच बाबांना खरी आदरांजली ठरेल.
- प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .