साने गुरुजी कथामाला जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
कथा आणि गोष्ट यामध्ये फरक असतो. गोष्ट ही एखादी घटना असू शकते परंतु कथेला कार्यकारण भाव असतो. कथा माणसाचे भावविश्व व्यापक बनवत असते. सर्वांचे मन आकर्षिणारी, उत्तम गुण संस्कार रुजविणारी कथा ही माणसाची भावनिक भूक असते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शंकर विभुते यांनी केले. प्रियदर्शिनी विद्यासंकुल नांदेड येथे सानेगुरुजी कथामाला हेलस ता. मंठा जि. जालना आणि मानस फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय साने गुरुजी कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, उत्तम कथाकार होण्यासाठी सभोवतालचे सूक्ष्म निरीक्षण, सौंदर्य दृष्टी, व्यासंग आणि शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या गुणांचा अंगीकार आपल्याला करता यायला पाहिजे. कथा सांगताना कथेतील पात्र आणि प्रसंग श्रोत्यांच्या समोर उभे करण्याची ताकद शब्दांमध्ये आणण्यासाठी निरंतर सराव करत राहिले पाहिजे.
यावेळी स्पर्धेचे जिल्हा संयोजक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी प्रास्ताविकातून साने गुरुजींच्या कार्याचा मागोवा घेताना गुरुजींच्या विचाराचा आणि कार्याचा वसा पुढे सुरू राहावा, संस्कारक्षम, मूल्याधिष्ठित, संवेदनशील आणि निस्वार्थी आदर्श नागरिकांची पिढी घडत राहावी या हेतूने हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.
जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून ही स्पर्धा बालगट (पाचवी ते सातवी) आणि किशोरगटात (आठवी ते दहावी) घेतली जाते. यावेळी जिल्हाभरातून अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यामध्ये बाल गटातून संचिता सुभाष अष्टेकर (प्रथम), आरुषी कदम (द्वितीय), पद्मावती जाधव (तृतीय) तर किशोर गटातून श्रावणी दुधाने (प्रथम) कृष्णा शिंदे (द्वितीय) यांनी यश संपादन केले. यशस्वी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तर इतर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियदर्शिनी विद्यासंकुल संस्थेचे अध्यक्ष बालासाब माधसवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी परीक्षक म्हणून प्रवीण राऊत, रूपाली गोजवडकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक अरुण अतनुरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यंकटेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यंकट गंदपवाड, बाबाराव विश्वकर्मा, त्र्यंबक स्वामी, सारंग स्वामी, सचिन दिग्रसकर, वर्षा कंटे, गुंजा वाडीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .