नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने उल्लास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत श्रावणी केंद्रस्तरीय प्रशिक्षक व स्वयंसेवक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण नवापूर तालुक्यातील श्रावणी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आज आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्रावणी केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नागरिकत्वाच्या दृष्टीने साक्षरता व्यक्तींना आपले हक्क-कर्तव्य समजावून जबाबदार नागरिक बनवते. तसेच आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनवीन ज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी साक्षरता अत्यावश्यक आहे. म्हणूनच जगभरात शिक्षण व ज्ञान यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकाला साक्षरतेच्या दिशेने पाऊल टाकण्याची प्रेरणा देतो.
सकाळच्या सत्रात महेंद्र नाईक यांनी कार्यक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे स्पष्ट केली. गोपाल गावीत यांनी साक्षरता ही केवळ अक्षर ओळख नसून, ती विचार करण्याची, योग्य निर्णय घेण्याची आणि समाजात स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याची ताकद आहे. साक्षरतेमुळे व्यक्तीला ज्ञानाची दारे खुली होतात आणि समान संधी मिळतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत यांना प्रगतीची संधी मिळते. साक्षरता आर्थिक विकासाला चालना देते, रोजगाराच्या संधी वाढवते आणि जीवनमान सुधारते. सामाजिकदृष्ट्या ती अंधश्रद्धा, अज्ञान आणि असमानता दूर करून जागरूक व प्रगतिशील समाज घडवते. स्वयंसेवकांची भूमिका अधोरेखित केली. बकाराम सुर्यवंशी यांनी अध्ययन-अध्यापन साहित्य व गणितीय घटक यांवर मार्गदर्शन केले, तर मिलींद जाधव यांनी भाषिक अध्यापन प्रक्रिया सत्र घेतले.
दुपारच्या सत्रात एफ.एल.एन ए.टी मूल्यांकनाबाबत गोपाल गावीत व महेंद्र नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी शाळास्तरीय नियोजन व व्हाट्सअप गट निर्मितीबाबत सूचना दिल्या तसेच साक्षरता दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सर्वांना साक्षरतेच्या प्रसारासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
प्रशिक्षणाचा समारोप आभार प्रदर्शन जगदीश कोकणी यांनी मानले. या उपक्रमामुळे स्वयंसेवकांना साक्षरता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .