१३३६ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली पारदर्शक पद्धतीने : प्रहार शिक्षक संघटनेकडून सीईओ नमन गोयल यांचा सत्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक बदली कार्यमुक्तीबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश


नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक हा समाजाच्या भविष्यास आकार देणारा घटक. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होती. मात्र यंदा नंदुरबार जिल्ह्यातील १३३६ प्राथमिक शिक्षकांची बदली पूर्णतः ऑनलाइन, पारदर्शक आणि निःपक्षपाती पद्धतीने करण्यात आली. या ऐतिहासिक पावलामुळे शिक्षकांच्या मनात प्रशासनाविषयी विश्वास दृढ झाला आहे.


बदली प्रक्रियेत कोणताही पक्षपात, दबाव किंवा अन्याय न होता, संगणकीय पद्धतीने सुस्पष्टरीत्या नियोजन करण्यात आले. यामुळे शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून, पारदर्शक व विधायक निर्णय प्रक्रियेचे हे आदर्श उदाहरण ठरले आहे.


या प्रक्रियेचे यशस्वी नेतृत्व मा. नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. भानुदास रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी  सौ. वंदना वळवी व मा. निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी, मा. रमेश गिरी शिक्षण विस्तार अधिकारी जि.प नंदुरबार यांनी केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा गौरव प्रहार शिक्षक संघटनेकडून करण्यात आला. जिल्हा मार्गदर्शक संजय गावित व जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना अभिनंदन करून सन्मान केला.


दरम्यान, बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या प्रश्नावरही संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ९ सप्टेंबर रोजी संघटनेच्या शिष्टमंडळाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कार्यमुक्ती संदर्भात चर्चा केली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी दुपारनंतर कार्यमुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले.


आदेशानुसार शिक्षकांनी १२ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त होऊन १३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात बदली शाळेत हजर राहणे बंधनकारक आहे. कार्यमुक्तीवेळी संगणकीय आदेश सादर करणे आवश्यक असून, खोटी माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तसेच शाळा शून्य राहू नये यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.


या निर्णयामुळे बदली झालेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, पारदर्शक बदली व कार्यमुक्ती प्रक्रियेबद्दल शिक्षकवर्गात समाधान व आनंद व्यक्त होत आहे. ‘सत्य, न्याय व पारदर्शकता’ या मूल्यांचा विजय झाला असल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील शिक्षकांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)