चेतक फेस्टिव्हलमध्ये काथर्दे खुर्दच्या चिमुकल्यांची चमकदार कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशाला नवचैतन्य देणाऱ्या चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा अंतर्गत आयोजित जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या कलागुणदर्शन कार्यक्रमात काथर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या चिमुकल्या कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.


“आम्ही शिवकन्या” या प्रेरणादायी गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य निखळ उत्स्फूर्तता, जाज्वल्य देशभक्ती आणि कलात्मकता यांचे उत्तम मिश्रण ठरले. नृत्यरचना, वेशभूषा आणि तालबद्ध सादरीकरणामुळे प्रदर्शनाला वेगळीच ऊर्जा लाभली. लहानग्या कलाकारांमधून दिसणाऱ्या शिस्त, आत्मविश्वास आणि परिश्रमाची दखल प्रेक्षकांनी मोठ्या कौतुकाने घेतली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात चेतक फेस्टिव्हल आयोजक समिती प्रमुख श्री. जयपालसिंह रावल (मुन्ना दादा) यांची कार्यतत्परता आणि कलावंतांना व मुलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संवेदनशील दृष्टी विशेष उल्लेखनीय ठरली. तर गटशिक्षणाधिकारी श्री. योगेश सावळे साहेब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होत असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक विजयकुमार सोनवणे, श्रीकांत वसईकर, तुकाराम आलट, शारदा कडवे यांनी मेहनत घेतली तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी वळवी, पोलीस पाटील ईश्वर वळवी, उपसरपंच गणेश वळवी, योगेश वळवी, खंड्या मोरे, गोपाल माळी, रवींद्र ठाकरे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांना दिलेले कलेचे प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन या सादरीकरणाला भक्कम पाया मिळवून देणारे ठरले. मुलांच्या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत उत्साहाने कौतुकाचे शब्द व्यक्त केले.


सारंगखेडा चेतक फेस्टिवलसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असून, ग्रामीण सांस्कृतिक उर्जेला नवे आयाम मिळत आहेत. अशा उपक्रमांमुळे उगवत्या कलाकारांचा आत्मविश्वास वाढीस लागून जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)