सूर्योदयाबरोबर होणारी सकाळ आणि सूर्यास्तानंतर होणारी रात्र यातील होणारे बदलांचे शालेय विद्यार्थ्यांना बालकांना कुतुहल वाटते. त्यांची जिज्ञासा त्यांना शांत बसू देत नाही. आई बाबांना, आजी आजोबा किंवा परिवारातील सदस्यांना आकाशातील घडामोडी बदल सतत प्रश्न विचारत असतात. शाळेत गेल्यानंतर आपल्या शिक्षकांना ते प्रश्न विचारतात. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत अनेक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात.
भौगोलिक घडामोडी त्याचे विज्ञान जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. एखादा शिक्षकांच्या रंजक अध्यापन पद्धतीने मुलांना जाणून घेण्याचा उत्साह दिसतो. गोष्टी -कथा मुलांना फार आवडतात. त्याच गोष्टीतून कथेतून भौगोलिक घडामोडीतील विज्ञान सांगितलं किंवा वाचायला दिलं तर त्या मुलांची नक्कीच जिज्ञासा प्रबळ होईल, भौगोलिक घटनाकडे आकर्षित होतील.. असेच छानस पुस्तक प्रसिद्ध साहित्यिक प्रा. देवबा पाटील यांनी 'आपली सूर्यमाला' या पुस्तकात कथा वजा गोष्टीने सांगितले आहे.
आपली सूर्यमाला यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अंतर्ग्रह, बहिर्ग्रह, पृथ्वी, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, प्लूटो, नेपच्यून, कायपरचा पट्टा, बट्टूग्रह अशा अनेकविध विषयी सविस्तर माहिती गोष्टी रुपात दिलेली आहेत. पुस्तकात शाळेतील मुले मुली, मुख्याध्यापक, ग्रंथपाल या सोबतच विवेक शहाणे सरांचे पात्र आहेत. शहाणे सरांचे उपक्रमशील आणि गणित विज्ञान शिकवणारे उत्तम पात्र रेखाटले आहे. ते विद्यार्थ्यांना समजून घेतात त्यांना बोलके करतात, प्रश्न उत्तराच्या रूपात सहजपणे आपली सूर्यमाला विषयी आकर्षण निर्माण करतात आणि समजावून सांगतात. यामुळे हे पुस्तक वाचनिय झाले आहे. मी तर म्हणेन प्रत्येक शाळेवर हे पुस्तक असावं, सर्वांनी ते वाचावं.
प्रा. पाटील यांचे बालकाव्यसंग्रह, किशोर काव्यसंग्रह, बालकुमार काव्यसंग्रह, बालकथासंग्रह, बाल कादंबरी, देशभक्ती काव्यसंग्रह, प्रेम काव्यसंग्रह, विज्ञान काव्यसंग्रह, युवा काव्यसंग्रह, कथासंग्रह, शैक्षणिक लेखसंग्रह, समीक्षाग्रंथ, विज्ञान कोडे असे अनेक पुस्तके असून अभ्यासक्रमिक पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने 'गंमत जंमत ' बालकाव्यसंग्रहातील 'खार ' ही कविता मराठी शाळांच्या दुसऱ्या वर्गाच्या 'मजेत शिकूया मराठी'त समाविष्ट केले आहे. 'बालकविता -कोश' मध्ये पाच बालकवितांचा समावेश सुद्धा झालेला आहे. ते बालकाव्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार निवड समितीवर ते कार्यरत आहे. अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत.
विज्ञान हे रुक्ष वाटते पण तेच विज्ञान जर रंजकपणे कथांच्या माध्यमातून सांगितले तर मुला-मुलींना आकलन सुलभ होते. विज्ञानाच्या क्लिष्ट भाषेच्या गुंतवण्यात न अडकता साध्या सरळ रंजक व सोप्या भाषेत या पुस्तकाद्वारे आपल्या सूर्यमालेतील विज्ञान स्पष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न प्रा. देवबा पाटील यांनी केला आहे. सूर्यमालेविषयी छोट्या दोस्ताना अनेक प्रश्न पडतात. सूर्य कसा उत्पन्न झाला ? ग्रह कसे निर्माण झाले ? आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली ? हे सारे ग्रह सूर्यमालेत कसे राहतात ? प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. बाल किशोर विश्वाला धरून यांची मांडणी असल्याने आपली सूर्यमाला पुस्तकातून मुले गगन भरारी घेतील यात मात्र शंका नाही.
⬛ पुस्तकाचे नाव : आपली सूर्यमाला
लेखक : प्रा. देवबा पाटील
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
(राज्य पुरस्कृत शिक्षक तथा बालभारती सदस्य)


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .