नांदेड / लोहा ( शालेय वृत्तसेवा ) :
पारडी गावातील प्राथमिक शाळा हीच या गावाच्या भवितव्याची गंगोत्री असून ती बालकांच्या उज्ज्वल भवितव्याला सुरेख आकार देत आहे . गावातील उद्यमी आणि संस्कारी पिढ्या घडविण्यासाठी येथील शिक्षकांचे मौलिक योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे ... ते पारडी शाळेतील खो खो खेळात राज्यस्तरावर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते .
कार्यक्रमारंभी विद्यार्थी लेझीम पथकाने सुंदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांच्या मानवी कमानीतून पाहुण्यांचे आगळे वेगळे स्वागत केले . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेने " मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा " कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे . त्यातून प्राप्त निधीतून अत्याधुनिक डिजिटल फलक शाळेने प्राप्त केले आहेत त्या अत्याधुनिक फलकांचे या प्रसंगी उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे सचिव चंद्रजीत जाधव आणि राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांचा लोहा तालुक्याच्या परंपरेनुसार खारीक आणि खोबऱ्याचा भव्य हार अर्पण करून सन्मान करण्यात आला . प्रारंभी कब्बडी खेळात राज्यस्तरीय नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पहार आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शाळेचे आदर्श मुख्याध्यापक माधवराव किसवे यांनी केले . आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या यशात आपले सर्व सहकारी शिक्षक , शालेय व्यवस्थापन समिती , ग्राम पंचायत आणि गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केले . या प्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रजीत जाधव यांनी आपल्या भाषणातून खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि मी पारडी गावाच्या यशवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत घेऊन जाण्याची हमी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली . खेळाचा सतत सराव करत राहण्याचा सल्लाही चंद्रजीत जाधव यांनी दिला ... या प्रसंगी जिल्हा खो खो संघटनेचे सचिव डॉ रमेश नांदेडकर यांनी पारडी येथील शाळेने केलेल्या प्रगतीचे वर्णन करून मुख्याध्यापकाच्या कार्याचा गौरव केला ...
या कार्यक्रमास अवघा गाव आणि पालकवर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होता. राष्ट्र निर्माणाच्या या भव्य दिव्य कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील तेरणा हायस्कूल चे मुख्याध्यापक निशिकांत देशमुख, राष्ट्रीय कब्बडी खेळाडू रितेश जाधव, सातारा खो खो संघटनेचे सचिव महेंद्रकुमार गाढवे, तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिर्षीकर , रमेश नांदेडकर , शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल आचने, माजी मुख्याध्यापक बी वाय चव्हाण, केंद्रप्रमुख बाबुराव फसमले, सरपंच प्रतिनिधी गोविंदराव डीकळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलराव डीकळे, बळीराम पवार , संभाजी पवार , दत्ता पवार, लक्ष्मण डिकळे शाळेतील शिक्षक मंगनाळे, ज्योती कदम, मीनाक्षी देशमुख, वाडीकर , सुरेखाताई आणि पारडीचे सर्व पालक विद्यार्थि उपस्थित होते .. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन देविदास बालाघाटे यांनी केले तर आभार फारूख शेख यांनी मानले .


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .