बालभारतीच्या उद्बोधन सत्राला बालेवाडी येथे प्रारंभ..
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षणात सकारात्मक परिवर्तन घडवणारे धोरण आहे. हे धोरण भारतकेंद्री असून आपल्या मातीशी जोडले जाणारे असल्याने आगामी काळात आपली शैक्षणिक मुळे अधिक घट्ट होणार आहेत असे मत प्रा. डॉ. दिनेश प्रसाद सकलानी, संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीने आयोजित केलेल्या पाठ्यपुस्तक निर्मिती उद्बोधन सत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बालवाटिकेच्या माध्यमातून एनसीआरटीने बालकांना भारतीय संस्कृतीशी जोडणारा विचार समोर आणला आहे. भारतीय कला आणि संस्कृतीचे जतन शैक्षणिक धोरणातून तसेच अभ्यासक्रमातून होईल असा विश्वास देखील यावेळी सकलानी यांनी व्यक्त केला. आजच्या काळात पालकांची मानसिकता बदलणे हे देखील एक महत्त्वाचे आव्हान अभ्यासक्रम निर्मितीदरम्यानचे आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची तसेच कौशल्यांची स्वतंत्र क्षमता असल्याने त्यानुसार प्रत्येक मुलासाठी अभ्यासक्रमाचा सूक्ष्म पद्धतीने विचार होणे गरजेचे आहे असेही सकलानी यावेळी म्हणाले.
शालेय वर्ष २०२७-२८ पासून इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी आणि ११ वीसाठी नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाणार आहे. या पाठ्यपुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेला दिशा देण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे बालभारतीकडून दोन दिवसीय उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
मुलांना मार्गदर्शन करणारा, मुलांना समजून घेणारा पुस्तकांचा गाभा टिकून राहायला हवा. गेल्या वर्षी बदलेल्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांकडून सध्या सकारात्मक पावती मिळताना दिसत आहे. अशा भावना मा. श्री. रनजीत सिंह देओल (भा.प्र.से.), प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केल्या. मुलांना आवडतील, भावतील आणि त्यांना आपली वाटतील अशा पुस्तकांची निर्मिती करणे आवश्यक आहे. पुस्तक निर्मितीचे काम हे नवनिर्माणाचे व समर्पणाचे काम आहे याचीही आपण जाणीव ठेवायला हवी असे ते यावेळी म्हणाले.
माहिती आणि ज्ञान यात मूलभूत फरक आहे आणि पुस्तके ज्ञान प्रदान करतात. बालभारतीची पुस्तके लोकप्रिय का आहेत याचे कारण विद्यार्थी स्वतः ही पुस्तक अभ्यासू शकतात. पुस्तकांनी मुलांना विचार करायला शिकवणे गरजेचे आहे. किंबहुना हीच पुस्तकांची मूलभूत जबाबदारी आहे. हेच लेखक आणि तज्ञ मंडळींसमोरील मुख्य आव्हान आहे. केवळ माहितीचा मारा न करता विद्यार्थ्यांना सृजनशील पद्धतीने अभ्यासक्रम शिकवता यायला हवा. असे मत मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.), आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केले.
पुस्तक निर्मितीची प्रक्रिया ही सृजनशील असते. या प्रक्रियेत सहभागी होणारे सर्वच तज्ञ मंडळी महत्त्वाचे काम करत असतात. आगामी पिढ्यांना दिशादर्शक ठरेल असे काम त्यांच्याकडून होवो अशी अपेक्षा यावेळी मा. डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या, हे पर्व परिवर्तनाचे पर्व आहे आणि शैक्षणिक परिवर्तनाची जबाबदारी आपल्यावर आहे. मागील वर्षी बालभारतीने ४ इयत्तांची व १० माध्यमांच्या पुस्तकांची निर्मिती केली. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले एनईपीच्या दृष्टिकोनातून पुढील अभ्यासक्रम बदलाचा नवीन टप्पा पार करायचा असून याकरिता समताधिष्टीत शिक्षणावर भर देऊन कौशल्यआधारित अभ्यासक्रम निर्मिती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांग तसेच विशेष मुलांसाठी अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्र विचार करण्यात आलेला असल्याचे देखील ओक यांनी यावेळी स्पष्ट केले.
निपुणता, विचार कौशल्य, एकात्मता, कौशल्य, व्यवसाय शिक्षण, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकसन ही बदलत्या नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्य आहेत. या वैशिष्टांचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये पायाभूत पद्धतीने विचार करण्यात येणार आहे. पुस्तक जग दाखवणारे साधन बनावे अशा प्रकारे अभ्यासक्रमाची निर्मिती आपण करूयात असा विश्वास मा. श्री. मिलिंद नाईक, सुकाणू समिती सदस्य, पुणे यांनी व्यक्त केला.
यावेळी मा. डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, मा नंदकुमार बेडसे सर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, मा त्रिगुण कुलकर्णी सर महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मा प्रा डॉ रंजना अरोरा, विभाग प्रमुख अभ्यासक्रम विकसन विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, मा. शरद गोसावी, संचालक प्राथमिक, मा. महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक यांच्यासह सुकाणू समितीचे तसेच विविध विषय समिती सदस्य आणि बालभारतीचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर बालभारतीच्या विद्या विभाग समन्वयक केतकी जानी यांनी आभार मानले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .